पूर्व मध्य अरबी समुद्र आणि कर्नाटक किनारपट्टीलगत असलेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे कोकणातील पाऊस आठवडाभर कायम राहणार आहे. अनेक भागांत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या कालावधीत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. गुरुवारी (९ जुलै) मराठवाडा वगळता राज्यात बहुतांश भागांत कमी-अधिक प्रमाणात पावसाची हजेरी होती. गेल्या चोवीस तासांत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटक्षेत्रात मुसळधार पाऊस झाला.

राज्याच्या किनारपट्टीलगतच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र असल्याने मुंबई, ठाणे परिसरासह कोकण विभागात अनेक ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे परिसरासह कोकणातील काही भागांत पावसाचा जोर कमी झाला असला, तरी अनेक ठिकाणी अद्यापही मुसळधार सरी बरसत आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यंमध्ये काही ठिकाणी अद्यापही पावसाचा जोर कायम आहे.

कोकण विभागाजवळ असलेल्या मध्य महाराष्ट्रातील विशेषत: पश्चिमेतील घाटक्षेत्रामध्येही जोरदार पावसाची हजेरी आहे. या भागातील पाणीसाठे आणि नद्यांच्या पाणी पातळीवर वाढ होत आहे. मराठवाडय़ात पावसाची विश्रांती असली, तरी विदर्भात मात्र अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, अकोला या भागांत पाऊस पडतो आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यंमध्ये आठवडाभर पाऊस कायम राहणार आहे. काही ठिकाणी मुसळधारांची शक्यता आहे. मुंबई आणि ठाणे परिसरात हलक्या सरींची हजेरी असेल. मध्य महाराष्ट्रात घाटक्षेत्रामध्ये पावसाची शक्यता आहे. १० ते ११ जुलैनंतर मराठवाडा आणि विदर्भातही काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. या भागात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटाचाही इशारा देण्यात आला आहे.

चोवीस तासांतील पाऊस (मिलिमीटर)

*   कोकण विभाग: मालवण (१५०), कणकवली (१४०), देवगड, (११०), राजापूर (९०), लांजा, माथेरान (८०), चिपळूण, खेड, दापोली, उल्हासनगर, कुडाळ, पोलादपूर (७०).

*    मध्य महाराष्ट्र: महाबळेश्वर (११०), गगनबावडा (९०), इगतपुरी, वेल्हे (६०), लोणावळा, पारनेर (५०).

*    मराठवाडा: मुखेड (७०), सोनपेठ (५०), अहमदपूर, उस्मानाबाद, परभणी (४०), देगलूर, देवणी, खुलताबाद (४०).

*    विदर्भ: बुलडाणा (८०), कारंजा लाड, मूर्तिजापूर (५०), मलकापूर, नंदूर (४०)