पिंपरी-चिंचवड : किरकोळ वादातून सख्या लहान भावाने मोठ्या भावाची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार मावळमधील माळवाडी येथे घडला आहे. राजू नामदेव केदारी (वय ४५) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तळेगाव एमआयडीसी पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, भिंतीवर पाणी पडत असल्याचा कारणावरून कैलास केदारी आणि राजू केदारी (दोघेही राहणार माळवाडी, अचानक नगर) या दोन सख्या भावांमध्ये वाद झाला होता. राग अनावर झाल्याने कैलासने राजू यांची शुक्रवारी रात्री हत्या केली. या प्रकरणी कैलाससह त्याचा मुलगा अमर केदारी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लहान भाऊ कैलासच्या घरातील पडवीच्या शेडच्या पत्र्याचे पाणी मोठा भाऊ राजू याच्या घराच्या भिंतीवर पडत होते. यावरून अनेक दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होता. मात्र, काल रात्री अचानक हा वाद विकोपाला गेला. त्यानंतर कैलासने आपल्या मुलाच्या मदतीने लोखंडी पाईप आणि दगडाने ठेचून मोठा भाऊ राजूची हत्या केली. हे भांडण आरोपीच्या घराच्या पत्र्यावर झाल्याने, मृतदेह देखील तिथेच पडून होता.

याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून मृत राजू केदारी यांच्या पत्नी भारती केदारी यांनी तळेगाव एमआयडीसी पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.