हवाई दल प्रमुख अरुप राहा यांची माहिती
भारतीय हवाई दलातील विमानांच्या देखभालीसाठी पुण्यातील तळावर कार्यान्वित करण्यात आलेली ‘इलेक्ट्रॉनिक मेन्टेनन्स मॅनेजमेंट सिस्टिम’ (ई-एमएमएस) यंत्रणा देशभरातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी कार्यान्वित केली जाईल. हवाई दलाच्या १२ विभागातील १७० ठिकाणी ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचे काम २०१७ च्या अखेपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याची माहिती हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अरुप राहा यांनी गुरुवारी दिली.
हवाई दलासाठी विप्रो कंपनीने पथदर्शी प्रकल्पांतर्गत विकसित केलेली ‘ई-एमएमएस’ यंत्रणा हवाई दलाच्या लोहगाव येथील तळावर कार्यान्वित करण्यात आली आहे. त्याचे उद्घाटन राहा यांच्या हस्ते झाले. हवाई दलाच्या दक्षिण-पश्चिम मुख्यालयाचे प्रमुख एअर मार्शल आर. के. धीर, हवाई दलाच्या मेन्टेनन्स विभागाचे एअर मार्शल पी. पी. खांडेकर, विप्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी टी. के. कुरियन, लोहगाव तळाचे प्रमुख एअर कमोडोर ए. के. भारती या वेळी उपस्थित होते.
अरुप राहा म्हणाले, हवाई दलाने सदैव आधुनिकीकरण आणि डिजिटायझेशनला प्राधान्य दिले आहे. त्यादृष्टीने ई-एमएमएस प्रकल्प हा महत्त्वपूर्ण आणि गुंतागुंतीचा प्रकल्प आहे. त्यामुळे या प्रकल्पाला निर्धारित वेळेपेक्षा दोन वर्षे विलंब झाला असला तरी आता हा प्रकल्प यशस्वीरीत्या कार्यान्वित झाला आहे. पुढील वर्षांअखेरीस हा प्रकल्प १७० ठिकाणी कार्यान्वित करण्यात येईल. सध्या सुखोई ३० या हवाई दलाच्या मुख्य लढाऊ विमानांसाठी हा प्रकल्प लागू झाला आहे. मात्र, लवकरच मिराज आणि मिग विमानांसाठीही याचा वापर सुरू होईल. हवाई दलातील ताफ्याच्या देखभालीदरम्यान ‘इन्व्हेन्टरी मॅनेजमेंट’ हा अतिशय आव्हानात्मक आणि कळीचा मुद्दा असतो. ई-एमएमएस या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे विमानांच्या देखभालीचे काम क्षणार्धात ऑनलाईन पद्धतीने होऊ शकेल. पूर्वी त्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करावी लागत असे. डिजिटल यंत्रणेमुळे स्क्वाड्रन, िवग्ज, कमांड अशा वेगवेगळ्या वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांना ही सेवा हवी तेव्हा मिळू शकणार आहे, असेही राहा यांनी सांगितले.