एल्गार परिषद आणि माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोपावरून विद्रोही कवी वरवरा राव यांना पुणे पोलिसांनी शनिवारी हैदराबाद येथून पुन्हा अटक करून आज दुपारच्या सुमारास पुणे सत्र न्यायालयात हजर केले. वरवरा राव यांनी मणिपूर, नेपाळ येथून हत्यारे आणण्याचा कट रचला असल्याचे सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी न्यायालया समोर सांगितले. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी १५ दिवसांची पोलीस कोठडीची मागणी त्यांनी केली. न्यायालयाने वरवरा राव यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी आता २६ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

युक्तिवाद करताना सरकारी वकील उज्वला पवार म्हणाल्या की, नक्षलवादी कारवायांमध्ये राव यांचा सहभाग तसेच भूमिगत असलेल्या नक्षलवाद्यांशी संपर्कात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. राव हे भूमिगत असलेल्या गणपती याच्या संपर्कात होते. तसेच त्यांनी मेलच्या माध्यमातून सांकेतिक भाषेत देखील संवाद साधला असून मणिपूर आणि नेपाळ येथून हत्यारे आणण्याचा कट ही रचला होता. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले. ते विद्यार्थी सध्या कोठे आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी १५ दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर बचाव पक्षाचा युक्तिवाद देखील झाला. त्यानंतर न्यायालयाने ८ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुणे न्यायालयात विशेष न्यायाधीश वढणे यांनी याप्रकरणी सुनावणी केली. सरकारी वकील म्हणून उज्वला पवार आणि बचाव पक्षाचे वकील रोहन नहार यांनी युक्तिवाद केला.