पिंपरी चिंचवडमधील दिघीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. सॉफ्टवेअर इंजिनीअर पती आणि त्याच्या पत्नीने फिनाईल प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. गुरुवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली.

सॉफ्टवेअर अभियंता राजू रंजन तिवारी (वय वर्षे ३५) त्याची पत्नी सिंधू राजू तिवारीसोबत दिघीमधील समर्थ नगरमध्ये राहात होता. राजू आणि सिंधू यांच्यामध्ये संध्याकाळी रात्री (१६ मार्च) साडेसात वाजता घरगुती कारणावरुन भांडण झाले. यानंतर रागाच्या भरात राजू आणि सिंधू यांनी फरशी पुसण्याचे फिनाईल प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार लक्षात येताच शेजारच्यांनी आणि नातेवाईकांनी त्यांना यशवंत चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल केले. आता दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

विशेष म्हणजे इंजिनीअर अभियंता राजू तिवारी आणि त्याची पत्नी सिंधू यांचे आपापसात पटत नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळेच हा सर्व प्रकार घडला असावा, असा संशय दिघी पोलिसांनी व्यक्त केला आहे. राजू आणि सिंधू यांच्या लग्नाला दहा वर्षे होऊनही त्यांना अपत्य नसल्याची माहितीदेखील समोर आली आहे.