पुण्यातील आंबेगावमध्ये असलेल्या सिंहगड कँपसमध्ये सीमा भिंत कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले आहेत. या घटनेत तीन जखमींचे प्राण वाचवण्यासाठी पुण्यातल्या एक तरूण सरसावला. त्याने ही दुर्घटना घडताच या ठिकाणी धाव घेत तिघांचे प्राण वाचवले. विकी खंदारे असं या तरूणाचं नाव आहे. तो इंजिनिअरींगच्या तिसऱ्या वर्षाला आहे.

विकीशी संवाद साधला असता तो म्हणाला की, घराच्या पार्किंगमध्ये मित्रासोबत मी गप्पा मारत बसलो होतो. तेवढ्यात मला अग्निशमन दलाची एक गाडी आणि रूग्णवाहिका दिसली. ज्यापाठोपाठ मी तिकडे गेलो आणि अग्निशमन दलाच्या जवानांना मदत केली. तीन जखमींना बाहेर काढून अॅम्ब्युलन्समध्ये बसवलं. तर एक मृतदेहही त्यावेळी हाती लागला असंही याा तरूणाने म्हटलं आहे. कोंढवा भागातली घटना ताजी असताना पुन्हा एक दुर्घटना घडली अशा किती मजुरांचा बळी प्रशासन घेणार आहे? असा संतप्त सवालही विकीने विचारला. बांधकामाच्या ठिकाणी संबधित व्यावसायिकाने मजुरांची काळजी घेणे अपेक्षित होते. मात्र कोणत्याही प्रकारची काळजी घेतली गेली नसल्याचे या घटनेतून दिसून येत आहे. अशा बांधकाम व्यवसायिकावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी देखील त्याने केली.

पुण्यातील आंबेगाव येथील सिंहगड कँम्पसच्या सीमा भिंतपासून काही फुटांच्या अंतरावर असलेल्या एका इमारतीचे बांधकाम सुरू होते. त्या कामासाठी मजुरांच्या निवाऱ्यासाठी बांधकाम व्यावसायिकांकडून २० पत्र्याच्या शेडची व्यवस्था करण्यात आली होती. याच शेडवर मध्यरात्रीच्या सुमारास सीमा भिंत कोसळली. ज्यामुळे सहाजणांचा मृत्यू झाला. कोंढवा घटनेचीच पुनरावृत्ती या ठिकाणी पाहण्यास मिळाली.