चिन्मय पाटणकर

गेल्या काही वर्षांपासून अभियांत्रिकीच्या हजारो जागा रिक्त राहात असताना राज्यातील कृषी पदवी अभ्यासक्रमांना मिळणारा प्रतिसाद वाढता आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमांचे प्रवेश पूर्ण होत असून अभियांत्रिकीचे अनेक विद्यार्थी आता कृषी अभ्यासक्रमांकडे वळत आहेत.

वातावरणातील बदलांचा शेतीवर होणारा परिणाम, शेतीमालाला भाव न मिळणे, पाण्याची टंचाई असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहेत. तसेच ग्रामीण भागातील तरुण रोजगारासाठी शहरांकडे जात असल्याचे वास्तव आहे. या पार्श्वभूमीवर कृषी अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा वाढता ओढा लक्षणीय ठरत आहे. राज्यात चार कृषी विद्यापीठांमध्ये मिळून १५ हजार २२७ जागा उपलब्ध आहेत. कृषी अभ्यासक्रमांसाठीही सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) बंधनकारक करण्यात आली आहे. यंदा कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी केवळ सीईटीचेच गुण ग्राह्य़ धरले जाणार आहेत. २०११ पासून महाविद्यालयांची संख्या आणि जागा वाढू लागल्या. त्यानंतर जागांमध्ये वाढ करण्यात आलेली नाही. या बाबत कृषी शिक्षणाचा बृहद् आराखडा तयार करून सरकारला सादर करण्यात आला आहे. कृषी अभ्यासक्रमांमध्ये बीएस्सी, बीटेक अंतर्गत कृषी अभियांत्रिकी, अन्न तंत्रज्ञान, मत्स्य विज्ञान अशा विविध अभ्याक्रमांचा समावेश होतो.

‘कृषी अभ्यासक्रम आता उपयोजित करण्यात आले आहेत. त्यांना प्रात्यक्षिकांची जोड देण्यात आली आहे. बदलत्या गरजांनुसार विषयांचा अभ्यासक्रमांत समावेश करण्यात आला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, २०१७ पर्यंत कृषी अभ्यासक्रमांना नसलेला व्यावसायिक दर्जाही आता मिळाला आहे. अभियांत्रिकीच्या जागा रिक्त राहात असल्याचे आपण पाहतो आहोत. अभियांत्रिकीचे विद्यार्थी चार वर्षे मुदतीच्या कृषी पदवी अभ्यासक्रमांकडे वळत आहेत. त्यामुळे कृषी पदवीच्या जागा रिक्त राहात नाहीत,’ असे निरीक्षण महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक डॉ. हरि कौसडीकर यांनी नोंदवले. शेती सर्वानी शिकावी, गुणवत्तापूर्ण विद्यार्थी शेतीकडे वळावेत, यासाठी सीईटी आवश्यक करण्यात आली. या बदलांचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. शेती अभ्यासक्रम पूर्ण करून सर्वच विद्यार्थी शेती करतात असे नाही, तर शासकीय सेवांसह विमा, बँकिंग अशा क्षेत्रातही संधी असल्याने विद्यार्थी या अभ्यासक्रमांकडे वळतात, असेही त्यांनी नमूद केले.

शहरी विद्यार्थ्यांचेही वाढते प्रमाण

कृषी अभ्यासक्रमांना केवळ ग्रामीण भागातील विद्यार्थीच प्रवेश घेतात असे नाही, तर शहरी भागातील विद्यार्थ्यांचेही प्रमाण लक्षणीय आहे. काही वर्षांपूर्वी कृषी अभ्यासक्रमाकडे वळणाऱ्या शहरी भागातील विद्यार्थ्यांचे प्रमाण २० टक्के होते. मात्र, आता या विद्यार्थिसंख्येत वाढ होत ते ५० टक्क्य़ांपर्यंत पोहोचल्याचेही डॉ. कौसडीकर यांनी नमूद केले.

कृषी पदवी अभ्यासक्रमांच्या उपलब्ध जागा

एकूण जागा – १५ हजार २२७

शासकीय – २ हजार ७७७

खासगी – १२ हजार ४५०