रिक्त जागा भरता याव्यात यासाठी विद्यार्थ्यांमागे ‘कमिशन’चीही योजना
राज्य सामईक परीक्षेचा (सीईटी) निकाल या वर्षी तुलनेने बरा लागला असला तरी गेल्या दोन वर्षांच्या अनुभवानंतर धास्तावलेल्या महाविद्यालयांनी ‘विद्यार्थी शोध मोहीम’ जोरात सुरू केली आहे. केंद्रीय प्रवेश प्रक्रिया झाल्यावर राहिलेल्या जागा भरायला विद्यार्थी शोधण्यासाठी काही संस्थांच्या प्राचार्यानी तर परराज्यांत फेऱ्या सुरू केल्या आहेत. काही महाविद्यालयांनी तर ‘विद्यार्थी शोधा आणि कमिशन मिळवा’ अशी योजनादेखील उघडपणे सुरू केली आहे.
गेली दोन वर्षे राज्यातील अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या जागा मोठय़ा प्रमाणावर रिक्त राहिल्या. या वर्षी सीईटीमध्ये तुलनेने जास्त विद्यार्थी पात्र ठरले आहेत. मात्र पात्र ठरूनही विद्यार्थी प्रत्यक्ष प्रवेश घेण्यासाठी येत नाहीत, असा गेल्या दोन वर्षांचा महाविद्यालयांचा अनुभव आहे. त्यामुळे गेल्या वर्षी दोन्ही अभ्यासक्रमांच्या जागा पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त रिक्त राहिल्या होत्या. त्यामुळे या जागा भरण्यासाठी महाविद्यालयांनी नवनव्या क्लृप्त्या शोधून काढल्या आहेत.
केंद्रीय प्रवेश प्रक्रिया संपली की रिक्त जागा भरण्याची महाविद्यालयांना मुभा मिळते. त्या जागा भरण्यासाठी परराज्यांमध्ये जाऊन महाविद्यालयांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तेथील अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा तपशील दलालांकडून पुरवण्यात येतो. त्या आधारे महाविद्यालयांमध्ये जाऊन तर कधी कार्यशाळांच्या माध्यमातून किंवा जाहिरातींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रवेशाची हमी दिली जाते. काही वेळा जागच्या जागी शुल्कात सवलत देऊन प्रवेश निश्चित करण्यात येतात. मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, छत्तीसगढ, उत्तर प्रदेश या राज्यांतील विद्यार्थी यावेत यासाठी प्राचार्यानी या राज्यांत धाव घेतली आहे. काही महाविद्यालयांनी प्रत्येक विद्यार्थ्यांमागे काही कमिशन देण्याची योजनाही शिक्षकांसाठी सुरू केली आहे.
खासगी शिकवण्यांकडून विद्यार्थ्यांचे तपशील विकत घेऊन केंद्रीय प्रवेश प्रक्रियेऐवजी आधीच महाविद्यालयांत प्रवेश निश्चित करण्यासाठीही विद्यार्थ्यांना राजी केले जात आहे.

या वर्षीची स्थिती काय?
परराज्यातही पुरेसे विद्यार्थी मिळणार का याची धास्ती अजूनही प्राचार्याना आहे. जेईई झालेले विद्यार्थीच शोधावे लागत आहेत. या वर्षी लेखी परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना पात्र ठरवण्यात येणार नाही, अशी तंबी तंत्रशिक्षण विभागाने दिली आहे. ‘सीईटीच्या वाढलेल्या निकालाने थोडी आशा बळावली आहे. गेल्या वर्षी पात्र विद्यार्थ्यांपैकी जवळपास ६० टक्के विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश घेतलाच नाही. त्यामुळे या वर्षी जागा भरतील अशी खात्री नाही,’ असे एका प्राचार्यानी सांगितले.

सीईटीच्या निकालानुसार प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी शुक्रवारी जाहीर झाली. त्यानुसार उपलब्ध जागांपेक्षा जवळपास एक लाख विद्यार्थी अभियांत्रिकी प्रवेशासाठी पात्र ठरल्याचे दिसत आहे. साधारण २ लाख ६२ हजार विद्यार्थी पात्र ठरले आहेत. त्यामुळे या वर्षी अभियांत्रिकी महाविद्यालयांतील प्रवेशाची स्थिती सुधारेल अशी आशा आहे. व्यवस्थापन अभ्यासक्रमासाठीही या वर्षी नोंदणी वाढली आहे.
– दयानंद मेश्राम, तंत्रशिक्षण सहसंचालक