तंत्रनिकेतनच्या स्थापत्य अभियांत्रिकीच्या (सिव्हिल इंजिनिअरिंग) दुसऱ्या वर्षांच्या बिल्डिंग प्लॅनिंग अँड ड्राइंग या प्रश्नपत्रिकेत चुका असल्याचे आढळून आले आहे. एकूण ७० गुणांच्या या प्रश्नपत्रिकेत प्रत्येकी बारा गुणांसाठीचे दोन प्रश्न चुकल्याने २४ गुण गमावावे लागण्याची विद्यार्थ्यांना भीती आहे.

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे (एमएसबीटीई) नव्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेचे हे पहिलेच वर्ष आहे. राज्यभरातील सुमारे २५ हजार विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. त्यात स्थापत्य अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षांच्या (चौथे सत्र) बिल्डिंग प्लॅनिंग अँड ड्राइंग या विषयाच्या सोमवारी झालेल्या परीक्षेत प्रश्न क्रमांक तीन आणि सहा यात चुका झाल्याचे निदर्शनास आले. हे प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक असलेल्या आकृत्याच प्रश्नपत्रिकेत दिलेल्या नसल्याने हे प्रश्न विद्यार्थ्यांना सोडवता आले नाहीत.

प्रश्नपत्रिकेतील प्रश्न अर्धवट असल्याचे विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर संबंधित चुकांबाबत  तंत्रशिक्षण मंडळालाही कळवण्यात आल्याची माहिती टॅपनॅफचे सचिव श्रीधर वैद्य यांनी दिली.

प्रश्नपत्रिकेतील चुकांची माहिती मिळाली आहे. या चुका का झाल्याची याची तपासणी केली जाईल. मात्र, कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही.

– डॉ. विनोद मोहितकर, संचालक, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ