माजी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण संस्थांशी पुन्हा जोडण्यासाठी माजी विद्यार्थी कक्ष स्थापन करण्याची सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशभरातील विद्यापीठांना के ली आहे. माजी विद्यार्थी कक्षाच्या माध्यमातून माजी विद्यार्थ्यांची नोंदणी करावी, त्यांना होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती द्यावी, चर्चासत्रे, परिषदांसाठी माजी विद्यार्थ्यांना निमंत्रितकरावे, मेळावे-कार्यक्रमांचे आयोजन करावे, असेही यूजीसीने स्पष्ट केले आहे.

नव्या शैक्षणिक धोरणामध्ये देशातील उच्च शिक्षण संस्थांनी जागतिक स्तरावर पोहोचण्यासंदर्भात भर देण्यात आला आहे. तसेच केंद्र सरकारकडून शिक्षणासाठी भारत जागतिक केंद्र होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शिक्षण संस्थांसाठी माजी विद्यार्थी हा महत्त्वाचा घटक असतो. विद्यार्थ्यांना सहकार्य, अभ्यासक्रम, निधी उपलब्धता अशा वेगवेगळ्या स्तरांवर माजी विद्यार्थी संघटना उपयुक्त ठरते. त्यामुळे देशातील शिक्षण संस्थांचा जागतिक स्तरावर नावलौकिक होण्यास माजी विद्यार्थी हातभार लावू शकतात. त्यामुळे माजी विद्यार्थी देशात आणि देशाबाहेर असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्याची सूचना यूजीसीने परिपत्रकाद्वारे विद्यापीठांना केली आहे. त्याबाबतचा अहवाल १५ फेब्रुवारीपर्यंत देण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.