सीआयडीक डून श्वानांच्या कामगिरीचे मूल्यांकन

लोकसत्ता राहुल खळदकर

पुणे : गंभीर गुन्ह्य़ांची उकल तसेच स्फोटके आणि अमली पदार्थ शोधण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या राज्यभरातील पोलीस श्वानांच्या कामगिरीचा आढावा आता राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) दरमहा घेण्यात येणार आहे.

राज्यभरातील पोलीस आयुक्तालयांच्या तसेच ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या अखत्यारीत असलेल्या ३५० श्वानांच्या कामगिरीचे वार्षिक मू्ल्यांकन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. श्वानांची देखभाल करणाऱ्या प्रशिक्षकांना (हँडलर) या चाचणीला सामोरे जावे लागणार आहे, अशी माहिती ‘सीआयडी’चे प्रमुख अतिरिक्त पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी दिली. राज्यातील पोलिसांच्या श्वानांना पुण्यातील सीआयडीच्या श्वान केंद्राकडून प्रशिक्षण देण्यात येते. शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात श्वान प्रशिक्षण केंद्र आहे. राज्यातील विविध पोलीस आयुक्तालये तसेच ग्रामीण पोलीस मुख्यालयात ४६ श्वान पथके आहेत. तसेच ५० बॉम्ब शोधक-नाशक पथके आहेत. या पथकांमध्ये सध्या ३५० श्वान कार्यरत आहेत, असे कुलकर्णी यांनी नमूद केले.

सीआयडीच्या तांत्रिक  सेवा विभागाचे पोलीस अधीक्षक राकेश कलासागर आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक नंदा पारजे यांच्याकडे श्वान प्रशिक्षण केंद्राची जबाबदारी आहे. याबाबत अतिरिक्त पोलीस अधीक्षक पारजे म्हणाल्या, तपासासाठी वापरण्यात येणाऱ्या श्वानांचा वापर तीन प्रकारांत केला जातो. गुन्ह्य़ांची उकल करणाऱ्या श्वानाला ‘ट्रॅकर’ तसेच स्फोटके हुडकून काढणाऱ्या श्वानाला ‘स्निफर’असे संबोधिले जाते. अमली पदार्थाच्या कारवायांसाठी वापरल्या जाणाऱ्या श्वानांना ‘नाकरे’ असे म्हटले जाते. श्वान पथकात जर्मन शेफर्ड, लॅब्रोडर, डॉबरमन या जातींच्या श्वानांचा वापर केला जातो. पोलीस मुख्यालयातील श्वान पथकाकडून श्वानांच्या पिल्लाची खरेदी केली जाते. पिल्लू सहा महिन्यांचे झाल्यानंतर त्याला प्रशिक्षणासाठी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या श्वान प्रशिक्षण केंद्रात पाठविले जाते. श्वानांचा प्रशिक्षण कालावधी सहा ते नऊ महिन्यांचा असतो. प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षकांकडून श्वानांना प्रशिक्षण दिले जाते. खडतर प्रशिक्षण दिल्यानंतर श्वान पोलीस सेवेसाठी सिद्ध होतो, असेही त्यांनी सांगितले.

श्वानांच्या कामगिरीचे मूल्यांकन कसे होणार?

सीआयडीच्या श्वान प्रशिक्षण केंद्राकडून दरमहा श्वानांची चाचणी घेतली जाणार आहे. त्यानंतर याबाबतचा अहवाल संबंधित श्वान पथकाच्या प्रमुखांना पाठविला जाणार आहे. श्वानाच्या कौशल्याबाबतची माहिती या चाचणीमुळे उपलब्ध होईल, असे ‘सीआयडी’चे प्रमुख अतिरिक्त पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी सांगितले.

श्वान प्रशिक्षणासाठी महिलांचा समावेश

श्वानांना प्रशिक्षण देण्यासाठी पुरुष कर्मचाऱ्यांची निवड केली जाते. गेल्या वर्षभरापासून महिला प्रशिक्षकांकडून श्वानांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. महिला पोलीस कर्मचारी श्वान प्रशिक्षक म्हणून चांगल्या प्रकारे काम करत आहेत. याबरोबरच श्वानांना ‘गार्ड डय़ुटी’ हे विशेष प्रशिक्षण दिले जाते. एखादी वस्तू किंवा महत्त्वाचा ऐवज असलेल्या पिशवीचे रक्षण करण्याचे काम उत्तम प्रकारे श्वान करत असल्याने गस्तीसाठी श्वानांचा वापर केला जात आहे.

राज्यातील पोलीस श्वान

श्वानांची जात                संख्या

लॅब्रोडर                             १९७

डॉबरमन                           ८३

जर्मन शेफर्ड                      ४५

बेल्जियम मेलेनाइज         २५