ज्येष्ठ गायिका पद्मा तळवलकर यांचे मत
प्रत्येक कलाकाराची गायकी, लय आणि अंदाज वेगवेगळा असतो. हे समजून घेत त्यांना साथसंगत करणे हे स्वतंत्र वादन करण्यापेक्षाही कठीण असते, असे मत ज्येष्ठ गायिका पद्मा तळवलकर यांनी व्यक्त केले.
गानवर्धन संस्थेतर्फे पद्मा तळवलकर यांच्या हस्ते प्रसिद्ध संवादिनीवादक सीमा शिरोडकर यांना आप्पासाहेब जळगावकर स्मृती स्वर-लय-रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष कृ. गो. धर्माधिकारी, प्रसिद्ध तबलावादक विश्वनाथ शिरोडकर, दयानंद घोटकर या वेळी उपस्थित होते. सीमा शिरोडकर यांचे संवादिनीवादन आणि कस्तुरी दातार-अट्रावलकर यांचे गायन झाले. पद्मा तळवलकर म्हणाल्या, गायक कलाकाराला जे वाटते ते आपले बनवून घेत संगतकाराला साथसंगत करावी लागते. तरच ती बैठक पुढे जाते आणि रंगते. हे समजून घेतले नाही तर गायक एकीकडे आणि वादक दुसरीकडे भरकटलेले दिसतात. त्यामुळे वादनामध्ये समतोल राखणे महत्त्वाचे असून त्यामध्ये संगतकाराची भूमिका महत्त्वाची असते.
सीमा शिरोडकर म्हणाल्या, गायक कलाकार चैतन्यपूर्ण गायन सादर करीत असल्यामुळे संगतकार म्हणून त्या मैफलीची उंची वाढविण्याची जबाबदारी आमची असते. स्वतंत्र वादनासाठी वेगळी प्रतिभा आणि तयारी लागते तशी ती संगत करतानाही आवश्यक असते. गुणी कलाकारांना संगत करून हा अनुभव आला. ज्या गायकांना साथसंगत केली त्या प्रत्येकालाच गुरू मानले. त्यांच्याकडून काही शिकायला मिळाले. त्यांना संगत करताना मी आतल्या आत गाते. म्हणून वादन करताना गायकी आतमध्ये भिनलेली असते.