भारताचा तिरंगी ध्वज आणि लष्कराचा ध्वज डौलाने फडकावत लष्कराच्या हेलिकॉप्टर्सने दिलेली सलामी.. १७ देशांच्या ३६० लष्करी जवानांनी एकत्रित केलेले शिस्तबद्ध संचलन..बॉम्बे इंजिनिअिरग ग्रुपच्या (बीईजी) घोषपथकाच्या भारून टाकणाऱ्या सुरावटी.. मेकनाईज्ड इन्फ्रंट्रीच्या जवानांनी सादर केलेली चित्तथरारक प्रात्यक्षिके.. मद्रास रेजिमेंटच्या जवानांचे रोमहर्षक युद्धकौशल्य दाखविणारे कलारीपटू.. गोरखा रायफल्सच्या जवानांचे कुकरीनृत्य.. अशा नावीन्यपूर्ण वैशिष्टय़ांसह भारतीय लष्कराच्या इतिहासातील सर्वात मोठय़ा बहुराष्ट्रीय संयुक्त सरावास बुधवारी शानदार प्रारंभ झाला.
आशियाई देशांचे व्यासपीठ असलेल्या आसियन सचिवालयाने या संयुक्त सरावासाठी पुढाकार घेतला आहे. भुसुरुंगांचा शोध घेऊन ते नष्ट करणे आणि शांतता मोहिमेदरम्यान कारवायांचा सराव असा दुहेरी या संयुक्त लष्करी सरावाचा उद्देश आहे. औंध येथील लष्करी तळावर (औंध मिलिटरी स्टेशन) लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल बिपीन रावत यांच्या प्रमुख उपस्थितीत या सरावाला प्रारंभ झाला. मंगळवापर्यंत (८ मार्च) चालणाऱ्या या सरावाला ‘एक्सरसाईज फोर्स १८’ हे नाव देण्यात आले असून यामध्ये ३६० जवांनाचा सहभाग आहे. परस्परांच्या लष्करातील कार्यपद्धतीची माहिती घेऊन त्याचा सराव आणि जागतिक शांतता व स्थैर्यासाठी आपली बांधीलकी दाखविणे ही या संयुक्त  सरावाची उद्दिष्टे आहेत. दोन गटांमध्ये हा सराव विभागण्यात आला आहे. भारत आणि व्हिएतनामचे लष्करी पथक भुसुरुंगांबाबत सराव करणाऱ्या गटाचे नेतृत्व करणार असून कंबोडिया आणि कोरियाचे लष्करी पथक शांतता मोहिमेबाबत सराव करणाऱ्या गटाचे नेतृत्व करणार आहे. या संयुक्त सरावामध्ये इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाईन्स, सिंगापूर, थायलंड, ब्रुनोई, बर्मा, लाओस, व्हिएतनाम या आशियाई देशांसह अमेरिका, जपान, चीन, रशिया, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया आणि न्यूझीलंड या देशांची लष्करी पथके सहभागी झाली आहेत. कंबोडियाने लष्करी पथकाऐवजी निरीक्षक पाठविले असून देशामध्ये असलेल्या अस्थिर वातावरणाचा परिणाम म्हणून म्यानमारने या सरावातून माघार घेतली आहे.