पिंपरी महापालिकेतर्फे आयोजित करण्यात येणारे अभ्यास दौरे हा आता थट्टेचा विषय झाला आहे. अभ्यास दौऱ्यांच्या नावाखाली पर्यटनाचा आनंद घेत मौजमजा केली जाते, हे उघड गुपित आहे. वर्षांनुवर्षे अशा दौऱ्यांची पिंपरी महापालिकेची परंपरा आहे. गेल्या दीड वर्षांत १६ दौरे झाले आहेत. मात्र, या दौऱ्यांचा उपयोग शहरासाठी वा शहरवासीयांसाठी झाल्याचे पाहावयास मिळत नाही.

पिंपरी महापालिकेचे अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी करदात्या नागरिकांच्या पैशांवर देशी-विदेशी दौरे करायचे आणि अभ्यासाच्या नावाखाली पर्यटनाचा आनंद घेत मौजमजाच करायची, हा गेली अनेक वर्षे अलिखित नियम झाला आहे. पिंपरी महापालिकेच्या इतिहासात आतापर्यंत शेकडो अभ्यास दौरे झाले असतील. त्यासाठी कोटय़वधी रुपये खर्ची पडले असतील. मात्र, त्यातून काय निष्पन्न झाले, हे कोणालाच ठामपणे सांगता येणार नाही. आधी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात असे कथित अभ्यास दौरे झाले. मात्र, महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतरही यात खंड पडलेला दिसत नाही. गेल्या दीड वर्षांतच १६ अभ्यास दौरे झाल्याचे सांगण्यात येते. गेल्या आठवडय़ात झालेला बार्सिलोना (स्पेन) दौरा अशाच आरोप-प्रत्यारोप आणि टीकाटिपणीमुळे भलताच चर्चेत राहिला.

‘स्मार्ट सिटी एक्स्पो वर्ल्ड काँग्रेस २०१८’ या परिषदेत सहभागी होण्यासाठी स्मार्ट सिटीचे संचालक मंडळ स्पेन दौऱ्यावर जाऊन आले. ४० देशांतील जवळपास दोन हजार स्मार्ट सिटी संचालक या परिषदेत सहभागी झाले होते. त्यात पिंपरीचे महापौर राहुल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, मनसेचे गटनेते सचिन चिखले, सदस्य प्रमोद कुटे, सहमुख्य कार्यकारी अधिकारी नीलकंठ पोमण, सहशहर अभियंता राजन पाटील हे आठ जण आमंत्रित होते. त्यासाठी २० लाख रुपयांच्या खर्चास महापालिकेने मान्यता दिली होती. त्यानंतर, भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि त्यांचे एक बांधकाम व्यावसायिक मित्रही या दौऱ्यात सहभागी झाले. स्वखर्चाने या दौऱ्यात सहभागी झाल्याचा युक्तिवाद त्यांच्याकडून करण्यात आला. उशिराने रवाना झालेले महापौर त्या परिषदेत हजरच राहिले नव्हते, हे नंतर उघड झाले.

वास्तविक, पदाधिकारी, नगरसेवक आणि अधिकारी यांचा सहभाग असणाऱ्या अशा परदेश दौऱ्यांचा शहरासाठी काहीही उपयोग होत नाही, हे यापूर्वी अनेकदा उघड झाले आहे. महापालिकेच्या पैशाने पर्यटनाचा आनंद लुटला जातो. यापेक्षा वेगळे तेथे काही घडत नाही. आतापर्यंत जितके म्हणून अभ्यास दौरे झाले, त्यापैकी कोणीही त्या-त्या दौऱ्यांचा अहवाल आल्यानंतर सादर केला गेला नाही. परदेशातून पाहून आलेली एखादी अनुकरणीय गोष्ट किंवा प्रकल्प असेल आणि त्याची शहरात नंतर अंमलबजावणी सुरू झाली, असेही काही पाहावयास मिळत नाही. त्यामुळे विकासाचा दृष्टिकोन, नागरिकांचे प्रश्न असे दावे करत होणारे परदेश दौरे प्रत्यक्षात निष्फळ ठरले आहेत. तरीही दौऱ्यांचा सोस काही कमी होताना दिसत नाही. ठरावीक कालावधीनंतर अशा अभ्यास दौऱ्याची टूम काढली जाते. सत्ताधारी आणि विरोधक असा भेद न करता सर्व जण त्या दौऱ्यांमध्ये सहभागी होतात. ‘पुढचं पाठ, मागचं सपाट’ अशा पद्धतीचे हे दौरे महापालिकेच्या खर्चाने होऊ नयेत. दौऱ्यांमध्ये ज्यांना मौजमजाच करायची आहे, त्यांनी स्वखर्चाने ती करावी. मात्र, जनतेच्या पैशांची उधळपट्टी त्यासाठी होऊ नये.

विरोधकांची टीका आणि दौऱ्यांचे समर्थन

परदेश दौरा म्हणजे जनतेच्या पैशावर टाकलेला दरोडा असल्याची टीका काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केली आहे. या दौऱ्यातून काय निष्पन्न झाले, याचा सविस्तर अहवाल जनतेपुढे सादर करावा, अशी मागणी त्यांनी केली. गेल्या वर्षी स्मार्ट सिटी परिषदेसाठी तत्कालीन महापौर नितीन काळजे एकटेच गेले होते. या वर्षी एवढा लवाजमा कशासाठी होता, असा मुद्दा उपस्थित करत शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी स्वखर्चाच्या सबबीखाली कोणीही दौऱ्यात सहभागी होऊ शकणार असेल, तर नागरिकांना तसे जाहीर आवाहन करायला हवे होते, असे मतही व्यक्त केले. दुसरीकडे, या दौऱ्यातून परतल्यानंतर सचिन चिखले यांनी झालेल्या टीकेला उत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, अशाप्रकारचे दौरे झालेच पाहिजेत. जेणेकरून विकासाच्या बाबतीत आपला दृष्टिकोन व्यापक होऊ शकतो. परदेशातील स्वच्छता, शिस्त, टपरीमुक्त शहर आणि पादचाऱ्यांना प्राधान्य अशा अनेक गोष्टींचे अनुकरण आपल्याकडे करता येऊ शकते, त्यासाठी सर्वाच्या सहकार्याने प्रयत्न व्हायला हवेत, असे मत त्यांनी मांडले.