पिंपरी-चिंचवड परिसरातील सांगवी भागात अनैतिक संबंधामधून एका इसमाची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय. कैलास तौर असं या मृत व्यक्तीचं नाव असून आज सकाळी साडेदहा वाजता कैलास यांचा मृतदेह राहत्या घरातल्या बाथरुममध्ये आढळून आला. कैलास तोर हे सांगवीमधील समर्थ नगर परिसरात एका भाड्याच्या खोळीत राहत होते. या प्रकरणात पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतल्याचं समजतं आहे. दोन दिवसांपूर्वीच तौर आपली पत्नी व मुलाला बीडला सोडून आले होते.

कैलास तौर हे मुळचे बीडमधील गेवराई परिसरात राहणारे आहेत. पिंपरी-चिंचवड पसिररात तौर यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी साडेदहा वाजल्याच्या सुमारास तौर यांचा मृतदेह राहत्या घरातल्या बाथरुममध्ये रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास केला असता सकाळी एक कामगार तौर यांच्या घरी आल्यानंतर हा प्रकार घडल्याचं पोलिसांना लक्षात आलं. महत्वाची गोष्ट म्हणजे याच कामगाराने पोलिसांना तौर यांच्या हत्येची माहिती दिली.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांना या प्रकरणात कामगारावर संशय आल्याने त्यांनी चौकशीसाठी कामगाराला ताब्यात घेतलं. यानंतर चौकशीदरम्यान कामगाराने दिलेल्या माहितीत मोठ्या प्रमाणात विसंगती आढळून आली. अधिक तपासात कामगाराच्या पत्नीचे व मयत कैलास तौरचे अनैतिक संबंध असल्याची माहिती समोर आली, याचसोबत तौर यांच्या शेजाऱ्यांनीही घटनेच्या एक दिवस रात्री तो कामगार तौर यांच्या घरापाशी दिसल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यामुळे पोलिसांचा कामगारावरचा संशय अधिकच बळावला, सध्या या प्रकरणात पोलिसांनी कामगाराला ताब्यात घेतलं असून यासंबंधी अधिक चौकशी सुरु आहे.