पिंपरी- चिंचवडमध्ये फेसबुक मित्राने विवाहित तरुणीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी २९ वर्षीय विवाहित तरुणीने वाकड पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी किरण तौरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तीन वर्षांपूर्वी फेसबुकवरून आरोपीची आणि फिर्यादीची ओळख झाली होती.

तक्रारदार तरुणीची बीडमध्ये राहणाऱ्या किरण तौर या तरुणाशी तीन वर्षांपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली होती. हळूहळू त्यांच्यातील मैत्री वाढली. किरण तिला भेटण्यासाठी बीडवरून पुण्यात यायचा. परंतू, या दरम्यान तक्रारदार तरुणीचे लग्न ठरले. तिने किरणला याची कल्पनाही दिली. मात्र त्याला हा प्रकार सहन झाला नाही. त्याने फेसबुक आणि व्हॉट्स अॅपवरून फिर्यादीला मानसिक त्रास देणे सुरू केले. तिचा फेब्रुवारी महिन्यात विवाह झाला. तरीदेखील तो तिला फोन, व्हॉट्स अॅप, फेसबुकवरून त्रास देत होता. एवढेच नाही तर तिच्या पतीसह सासरच्यांना फोन करून धमकी द्यायला सुरुवात केली. तिच्यासोबत लग्न करायचे नाही. माझ्याशिवाय ती दुसऱ्याशी कोणाशीच लग्न करु शकत नाही, अशी धमकी किरणने दिली आहे. विवाहित तरुणीच्या फेसबुक आणि व्हॉट्स अॅपवर किरण तौरने स्वतःच्या जीवाचे बरे- वाईट करून घेईल अशी धमकी दिली. तसेच तिला शिवीगाळ केली. अखेर तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. वाकड पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून घेतला आहे.