पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर सुविधांचा अभाव

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाचा वापर करणाऱ्या लाखो नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शासनाने विविध घोषणा केल्या. मात्र, त्याची अपेक्षित अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक पाठपुरावा न झाल्याने ‘घोषणांचा सुळसुळाट, पुढचे पाठ अन् मागचे सपाट’ अशी परिस्थिती दिसून येते. वेगवान वाहतुकीसाठी ओळखला जाणारा हा मार्ग आता सततचे अपघात, वाहतुकीचा नियमित खोळंबा अशा कारणांसाठी देखील ओळखला जातो. पावसाळ्यात भेडसावणाऱ्या समस्या नेहमीच्याच आहेत. हा मार्ग अधिक सुरक्षित आणि आवश्यक सुविधांयुक्त कधी होणार, असा प्रश्न सर्वाना पडला आहे. या विषयीच्या अनेक घोषणा झाल्या, मात्र, त्या हवेतच विरल्याने मूळ प्रश्न कायम आहेत.

पुणे-मुंबईला जोडणाऱ्या, जवळपास ९५ किलोमीटर अंतर असणाऱ्या यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गाचा (एक्स्प्रेस वे) वापर लाखो प्रवासी करतात. मात्र, हा मार्ग कितपत सुरक्षित आहे, याविषयी साशंकता व्यक्त करण्यासारखी परिस्थिती आहे. या रस्त्यावर अपघात होणे तथा वाहतुकीचा खोळंबा होणे, हे प्रकार आता नेहमीचे झाले आहेत. अवजड वाहने मध्येच बंद पडतात, अपघात झाल्यानंतर ती वाहने बाजूला करण्यासाठी बराच वेळ लागतो. त्यामुळे वाहनांच्या लांब रांगा लागतात. घाट क्षेत्रात अपघातांचे सत्र कायम आहे. त्यामुळे कित्येकांचे जीव गेले आहेत. या मार्गासाठी निश्चित करण्यात आलेली वेगमर्यादा पाळली जात नाही. लेनची शिस्त पायदळी तुडवण्यात येते. अवजड वाहने डावीकडून एका बाजूने पुढे जाणे अपेक्षित असताना, ही वाहने प्रत्येक लेनमध्ये शिरतात, त्याचा परिणाम म्हणजे संपूर्ण महामार्गाची वाहतूक संथ होते. विशेषत: घाट परिसरात वाहतुकीची हमखास कोंडी होते. वाहतूक पोलीस अशा घुसखोर वाहनचालकांवर कोणतीच कारवाई करत नाही, त्यामुळे ते मुजोर झाले आहेत. अशा वाहनस्वारांवर वाहतूक पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात येईल आणि त्यांची छायाचित्रे काढली जातील व संबंधितांवर कारवाई करण्याचा निर्णय झाला होता. प्रत्यक्षात, तसे झाले नाही.

वाहनांचा वेग तसेच अवजड वाहनांची घुसखोरी तपासून पाहण्यासाठी द्रुतगती महामार्गावर ‘ड्रोन’द्वारे पाहणी करण्याची घोषणा झाली होती. मोठा गाजावाजा करत त्याची चाचणी घेण्यात आली. मात्र, त्याचेही पुढे काही झाले नाही. द्रुगतगी महामार्गावरील अपघातांचे प्रमाण लक्षात घेऊन या ठिकाणी सुरू करण्यात आलेले ‘ट्रामा केअर सेंटर’ धूळ खात पडून आहे. अपघातातील रुग्णांना तत्काळ उपचारासाठी नेण्याकरिता हेलिकॉप्टर सेवा उपलब्ध करून देण्याचा विचार मांडण्यात आला, त्याचे खूप कौतुक झाले. मात्र, हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्याच्या घोषणेस मूर्त स्वरूप लाभले नाही. दुभाजकावर भक्कम ‘रोप-वे’ लावण्याची घोषणा झाली. सुरुवातीला काही ठिकाणी ते बसवण्यात आले, मात्र ते अर्धवट सोडण्यात आले. मार्गात मध्येच जनावरे येतात, तर कधीतरी स्थानिक रहिवाशांची दुचाकी वाहने जात असल्याचेही दिसून येते, अपघातालाही तेही निमित्त ठरते. पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडतात, तेथे तात्पुरती मलमपट्टी केली जाते. त्यामुळे पुन्हा खड्डे पडतात व ते धोकादायक ठरू शकतात. मध्यंतरी दरड कोसळण्याच्या घटना घडू लागली. जुलै २०१५ रोजी तीन जणांचा बळी गेला, त्याची शासनाने दखल घेत संरक्षणात्मक उपाययोजना सुरू केल्या. हे काम संथगतीने सुरू आहे. पाऊस सुरू झाला तरी जाळी बसवण्याचे काम सुरू आहे. एकूणात, येथील सुरक्षाविषयक बाबींकडे गांभीर्याने घेत त्याची पूर्तता करण्याची मागणी होतोहे.