पिंपरी पालिकेत आमदारांच्या अंदाज समितीची तीन तास बैठक

धादांत खोटी, अपुऱ्या स्वरूपाची तसेच दिशाभूल करणारी माहिती दिल्याने पिंपरी पालिकेतील जवळपास सर्वच प्रमुख अधिकाऱ्यांची शासनाच्या विधानमंडळ समिती सदस्यांनी गुरुवारी चांगलीच खरडपट्टी काढली. पिण्याचे पाणी, आरोग्य, सांडपाणी व्यवस्थापन, शिक्षण, उद्यान, पर्यावरण, स्वच्छता आदी विविध मुद्दय़ांवरून समितीने अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. पिंपरीतील जिजामाता रुग्णालयाचे काम रखडण्याचे कारण सांगताना शहर अभियंत्यांनी थेट मुख्यमंत्र्यांचे नाव घेतल्याने सर्व जण अवाक झाले.

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय अंदाज समितीचा गुरुवार आणि शुक्रवार असा दोन दिवस पिंपरी-चिंचवडचा दौरा आहे. त्या अंतर्गत, समितीप्रमुख आमदार अनिल कदम यांच्या नेतृत्वाखाली जवळपास १५ आमदारांनी सकाळी पिंपरी पालिकेला भेट दिली. महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी समितीचे स्वागत केले. स्थायी समितीच्या सभागृहात सकाळी अकरा ते दुपारी दोन अशी जवळपास तीन तास बैठक झाली. या बैठकीत प्रभारी अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर, प्रशासनप्रमुख महेश डोईफोडे, शहर अभियंता अंबादास चव्हाण, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, मुख्य लेखापरीक्षक पद्मा तळदेकर, सहशहर अभियंता रवींद्र दुधेकर, कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, संजय कांबळे, आरोग्यप्रमुख विजय खोराडे, शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी बजरंग आवारी आदींना समितीने फैलावर घेतले. उद्यान अधीक्षक सुरेश साळुंके अनुपस्थित राहिल्याने त्यांच्याविषयी तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पिण्याचे पाणी व त्या अनुषंगाने इतर विषयांवर रवींद्र दुधेकर यांची चांगलीच झाडाझडती घेण्यात आली. दूषित पाणी व पर्यावरणावरून संजय कुलकर्णी, शाळा व्यवस्थापनावरून बजरंग आवारी यांना तर विसंगत उत्तरे देण्यावरून कांबळे यांना धारेवर धरण्यात आले. अधिकारी ऐकत नाहीत, माहिती उपलब्ध करून देत नाहीत, अशी तक्रार तळदेकर यांनी केली, तेव्हा त्यांनाच समितीने खडसावले. निलंबित लिपिकांना पुन्हा रुजू करून घेण्यावरून डोईफोडे यांना जाब विचारण्यात आला. वैद्यकीय सेवेचे ‘तीन तेरा’ वाजल्याचे निदर्शनास आणून देत डॉ. अनिल रॉय यांना फैलावर घेतले.