बनावट नोटा चलनात आणणाऱ्या एकाला अतिरिक्त सत्र न्यायाधीश अशोककुमार भिल्लारे यांनी पाच वर्ष सक्तमजुरी आणि चार हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. आरोपीकडून पोलिसांनी पाचशे रुपयांच्या ४३९ आणि एक हजार रुपयांच्या ४८ बनावट नोटा जप्त केल्या होत्या. आरोपीला बनावट नोटा देणारा बांगलादेशी नागरिक या गुन्ह्य़ात फरार आहे.
वसंत जगन्नाथ जगताप (वय ४५, रा. चेतन पार्क, आंबेगाव पठार) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचा साथीदार मेहरुल्ला अल्लीउद्दीन शेख (वय ३०, रा. मुर्शीदाबाद, बांगलादेश) हा फरार आहे. मैत्रिणीचा खून केल्याप्रकरणी जगताप याला पोलिसांनी अटक केली होती. तर बांगलादेशी नागरिक शेख याला बनावट नोटा बाळगल्याच्या प्रकरणात पोलिसांनी अटक केली होती. कारागृहात दोघांची ओळख झाली होती. शेख याने त्याला कारागृहात खऱ्या नोटांच्या बदल्यात दुप्पट बनावट नोटा देण्याचे आमिष दाखविले होते. दरम्यान, कारागृहातून शेख आणि जगताप हे जामीन मिळवून बाहेर पडले होते. कारागृहातून बाहेर आल्यानंतर जगताप हा कामाच्या शोधात होता.
जगताप याला काम न मिळाल्याने त्याने शेख याच्याशी संपर्क साधला होता. त्याने मित्रांकडून तीन लाख रुपये उसने घेऊन शेख याच्याकडून बनावट नोटा घेतल्या. जगताप हा बनावट नोटा चलनात आणण्याच्या प्रयत्नात होता. वानवडी परिसरात बनावट नोटा चलनात आणण्याच्या प्रयत्न करणाऱ्या जगताप याला दुकानदारांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्याच्याकडून दोन लाख ६७ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील मारुती वाडेकर यांनी नऊ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या. न्यायालयाने साक्ष आणि पुरावे ग्राह्य़ धरून जगताप याला पाच वर्ष सक्तमजुरी आणि चार हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.