राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय डिझायनर्सनी बनवलेले कपडे विकत घेणे ही आता फक्त आणि फक्त उच्चभ्रू मंडळींपुरती गोष्ट राहिलेली नाही. फॅशन क्षेत्राने आपल्या रोजच्या जीवनात इतका शिरकाव केला आहे, की अनेक जण काही ना काही निमित्त साधून डिझायनर कपडय़ांची हौस पुरवून घेतात. असाच एक लोकप्रिय डिझायनर ब्रँडम्हणजे निवेदिता साबू’. मूळच्या पुण्यातून सुरू झालेल्या या ब्रँडचे कपडे हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक तारेतारकांनी वापरलेच, शिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक फॅशन शोमध्येही ते सादर झाले आहेत.

पूर्वी घरातील स्त्रियांचे आणि पुरूषांचेही वेगवेगळे शिलाई दुकान ठरलेले असे. बाजारातून कापड आणायचे आणि हवे तसे कपडे शिवून घ्यायचे ही परंपरा. त्याबरोबरीनेच सणासुदीला लक्ष्मी रस्त्यावरील ठरलेल्या दुकानांमधून कपडेखरेदीही ठरलेली. अजूनही ही पद्धत कायम असली तरी त्यात एका गोष्टीची भर पडली आहे, ते म्हणजे खास ‘डिझायनर’ने बनवलेले कपडे. ‘डिझायनर’ हा केवळ अतिश्रीमंतांसाठीच असतो, हा समजही बदलला. डिझायनर कपडे महाग असले तरी अनेक जण प्रसंग व हौस या गोष्टी डोक्यात ठेवून त्याचा विचार करू लागले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक डिझायनर ब्रँड आपल्याला माहीत झाले. पुण्यात सुरू झालेला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक ‘फॅशन शो’मध्ये पोहोचलेला असाच एक ब्रँड म्हणजे ‘निवेदिता साबू’.

निवेदिता साबू या मूळच्या पुण्याच्याच. त्यांची आई डॉक्टर, तर वडील अभियंता. पण निवेदिताला लहानपणापासूनच कलांविषयी आवड होती. चित्रकला आणि कथक नृत्यात त्यांना रस होता. त्यामुळे मोठेपणीही कलाक्षेत्राशी संबंधित काहीतरी करायचे हे त्यांचे पक्के ठरले होते.  मात्र पूर्णवेळ चित्रकलेकडे वळावे की फॅशन डिझायनिंग शिकावे याचा निर्णय होत नव्हता. मग त्यांनी दहावीची परीक्षा दिल्यानंतर फॅशन डिझायनिंगचा दोन महिन्यांचा अभ्यासक्रम करून पाहिला. ते त्यांना इतके आवडले, की पुढे काय शिकायचे याबद्दल काही शंका राहिलीच नाही. दिल्लीच्या ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन डिझायनिंग’मध्ये त्यांना प्रवेश मिळाला. आपण खूप लक्ष देऊन अभ्यासक्रमातील अधिकाधिक गोष्टी आत्मसात करायला हव्यात, असा निवेदिता यांचा कल राहिला. अभ्यासक्रमात त्यांनी सुवर्णपदक पटकावलेच, शिवाय वयाच्या केवळ एकोणिसाव्या वर्षी त्यांची ‘अरविंद ब्रँडस्’मध्ये प्रमुख डिझायनर म्हणून निवड झाली.

बंगळुरूत ‘अरविंद ब्रँडस्’मध्ये नोकरी करत असताना निवेदिता यांना कामाची शिस्त शिकायला मिळाली. मोठय़ा ब्रँडस्च्या दहा ते पंधरा हजार शर्टाचे उत्पादन त्यांच्या निर्णयावर अवलंबून असे. त्यामुळे काळजीपूर्वक मोठे निर्णय घ्यायला त्या शिकल्या. त्यानंतर २००२ मध्ये त्या पुण्याला परत आल्या आणि घरातूनच एक शिवणाचे मशीन व कपडे शिवणारी एक व्यक्ती यांच्यासह त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. भारतीय व जागतिक स्तरावरील फॅशन क्षेत्र, त्यातील इतर ब्रँडस्चा अभ्यास, व्यवसायाशी निगडित असलेल्या तांत्रिक गोष्टींचा अभ्यास सुरू होताच. पंधरा वर्षांपूर्वी पुण्यात डिझायनर कपडय़ांचे फारसे प्रस्थ नव्हते. तयार कपडे घेणे किंवा नेहमीच्या दुकानातून कपडे शिवून घेणे हेच पर्याय अवलंबले जात. त्यामुळे डिझायनरने कपडे शिवताना काय वेगळा विचार केलेला असतो हे त्यांना सुरूवातील ग्राहकांना समजावून सांगावे लागे.

सुरुवातीला त्यांनी ‘निओ कुटय़ूअर’ या नावाने स्वत:चा ब्रँड सुरू केला होता. परंतु आंतरराष्ट्रीय फॅशन ब्रँडच्या पद्धतीप्रमाणे त्यांनीही ब्रँडला स्वत:चे नाव द्यावे असा सल्ला अनेकांनी त्यांना दिला. त्यानंतर ‘निवेदिता साबू’ याच नावाने त्यांचा ब्रँड रुजला. आपल्या ब्रँडचे वैशिष्टय़ काय असावे हेही त्यांनी निश्चित केले होते. कपडय़ांवर केल्या जाणाऱ्या भारतीय कारागिरीविषयी त्यांना ओढ आहे. ‘आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘भारतीय डिझायनर’ म्हणूनच ओळख झालेली मला आवडेल. त्यामुळे आजच्या पिढीला आवडेल असे डिझाईन बनवताना त्यातील भारतीय आत्मा टिकून राहायला हवा हे मी पाहिले. देशी कारागिरीला डिझाईन्समध्ये महत्त्व मिळावे यासाठीही सुरूवातीपासून जाणीवपूर्वक प्रयत्न केले,’ असे त्या सांगतात. या ब्रँडचे डिझाईन व कपडय़ांचे उत्पादन पुणे आणि मुंबईत होते.

लंडन फॅशन वीक, पॅरिस, मिलान आणि दक्षिण कोरिया या ठिकाणी त्यांनी डिझाईन केलेली वस्त्रप्रावरणे सादर झाली आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत अक्षय कुमार, दीपिका पदुकोण, करीना कपूर, नवाजुद्दीन सिद्दिकी, सुशांत सिंग राजपूत, जॅकलीन फर्नाडिस, लीसा हेडन अशा अनेक तारेतारकांसाठी त्यांनी कपडे डिझाईन केले आहेत. ‘प्रत्येक ग्राहकासाठी खास कपडे डिझाईन करताना त्याचे व्यक्तिमत्त्व, कुटुंब, व्यवसाय आणि त्यांना अपेक्षित असलेली स्वत:ची प्रतिमा या सर्व गोष्टींचा सखोल विचार डिझायनरला करावा लागतो. मोठमोठय़ा लग्नांमध्ये वधू-वरासह लहान मुलांपासून वृद्ध मंडळींपर्यंत सर्वाचे कपडे डिझाईन करून घेतले जातात. अशा वेळीही डिझाईन्समध्ये खास विचार करावा लागतो,’ असे त्या सांगतात.

जागतिक स्तरावर भारतीय कारागिरीला पुढे आणणारा ब्रँड म्हणून त्यांना व्यवसायवृद्धी करायची आहे. यात ‘निवेदिता साबू’ या ब्रँडपासून वेगवेगळे उप ब्रँडस् तयार करण्याचा त्यांचा मनोदय आहे.

sampada.sovani@expressindia.com