तो अमेरिकेचा नागरिक.. कामाच्या निमित्ताने भारतात आल्यानंतर एका तरूणीशी ओळख.. तिच्याशी प्रेमविवाह केल्यानंतर काही वर्षे त्यांना मुलबाळ झाले नाही.. एक मुलगी दत्तक घेतली.. पण काही वर्षांतच दोघांमध्ये खटके उडाल्याने प्रकरण घटस्फोटासाठी न्यायालयात..मुलाचा ताबा आईने मागितला..पण, तो अमेरिकेत असताना देखील पुण्यात राहून तिची व्यवस्थित काळजी घेत असल्याने मुलीचा ताबा वडिलांकडे देण्याचा आदेश नुकताच पुणे कौटुंबिक न्यायालयाने दिला.
मूळचा अमेरिकेचा असलेला अॅलन (नाव बदलले) कोरेगाव पार्क येथे राहण्यास असून त्याचे स्वत:चे घर आहे. त्याचा अमेरिके त व्यवसाय असून तो या ठिकाणाहून सर्व व्यवहार पाहतो. साधारण दहा वर्षांपूर्वी अॅलन आणि संध्या (नाव बदललेले) यांची कामाच्या निमित्ताने गोव्यात ओळख झाली. त्यांच्या भेटी वाढत गेल्या आणि त्यांनी नंतर प्रेमविवाह केला. मात्र, त्यांना मूल होत नसल्यामुळे त्यांनी पुण्यातील एका संस्थेतून मुलगी दत्तक घेतली. ती मुलगी चार वर्षांची होईपर्यंत त्यांचा संसार व्यवस्थित चालला. मात्र, किरकोळ कारणावरून नंतर त्यांच्यात वादावादी होऊ लागली. त्यामुळे संध्याने पुण्यातील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी दावा दाखल केला. त्याचबरोबर पोटगी मिळावी म्हणून तिने न्यायालयात मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने संध्याला पोटगी मंजूर केली आहे.
संध्याने मुलीचा ताबा तिच्याकडे मिळावा म्हणून न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या दरम्यानच्या काळात त्यांची मुलगी अॅलनकडे राहण्यास होती. तो तिची व्यवस्थित काळजी घेत होता. न्यायालयाने संध्याला तिचा कायमच्या पत्त्याचा पुरवा सादर करण्यास सांगितला. मात्र, ती न्यायालयात कायमचा पत्ता सादर करू शकली नाही. उलट अॅलन याचे कोरेगावपार्क भागात स्वत:चे घर असून मुलीसाठी भारतात राहून सर्व व्यवसाय तो पाहतो. काम असेल तर मुलीला सोबत घेऊन जातो. मुलीची वडीलच जास्त चांगली काळजी घेत असल्यामुळे न्यायालयास दिसून आल्यानंतर मुलीचा ताबा वडिलांकडे ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. पती-पत्नीने मुलगी दत्तक घेतल्यानंतर त्यांचे संबंध ताणले जाऊन प्रकरण घटस्फोटापर्यंत गेले; नियमाप्रमाणे मुलीला ज्या संस्थेतून दत्तक घेतले, त्या ठिकाणी तिला परत द्यावे लागते. मात्र, या प्रकरणात अॅलन मुलीची चांगली काळजी घेत असल्याचे न्यायालयाच्या लक्षात आल्यामुळे मुलीचा ताबा वडिलांकडे देण्याचा आदेश न्यायालयाने दिला.
याबाबत अॅड. सुप्रिया कोठारी यांनी सांगितले की, मुलांची काळजी आईच घेते हे गृहीत धरलेले असते. मात्र, अलिकडे वडीलसुद्धा मुलांची चांगली काळजी घेत आहेत. अनेक वेळा महिला नवऱ्याला त्रास देण्यासाठी मुलांचा ताबा मागत असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे, मूल दत्तक घेताना करारपत्र केले जाते. मुलाला आई-वडिलांचा सहारा मिळून घर मिळणार असल्यामुळे मुलास दत्तक दिले जाते. मात्र, मुलास दत्तक घेतलेल्या दाम्पत्यामध्ये वाद सुरू झाले आणि त्याचे प्रकरण घटस्फोटापर्यंत गेले, तर दत्तक घेतलेले मूल परत संस्थेकडे देण्याची अट असते. मात्र, या खटल्यामध्ये मुलीचे वडील तिची चांगल्या पद्धतीने काळजी घेत असल्याचे दिसून आले. त्याचबरोबर मुलगी दत्तक देणारी संस्थासुद्धा त्या व्यक्तीच्या पाठीमागे उभी राहिली. न्यायालयाने मुलीचा ताबा वडिलांकडे ठेवण्याचा आदेश दिला.