नाक्यानाक्यावर मिळणाऱ्या चटकदार चायनीज पदार्थावरही आता अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) नजर ठेवण्याचे ठरवले आहे. ‘मॅगी नूडल्स’च्या विक्रीवर राज्यात बंदी आल्यानंतर आता खवय्यांची गर्दी खेचणाऱ्या चायनीज नूडल्सचीही तपासणी होणार आहे.
मॅगी नूडल्समध्ये शिश्याचे प्रमाण अधिक आढळणे तसेच त्यात ‘मोनोसोडियम ग्लुटामेट’ म्हणजेच अजीनोमोटोही आढळल्याबद्दल ५ जूनला राज्यात मॅगी विक्रीवर बंदी घालण्यात आली. त्यानंतर बाजारात मिळणाऱ्या इतर ब्रँडच्या नूडल्सचे नमुनेही अन्न विभागाने विश्लेषणास पाठवले असून त्याचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत. या पाश्र्वभूमीवर आता चायनीज पदार्थाची तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार असून पालख्या पुणे शहरातून बाहेर पडल्यानंतर या मोहिमेस सुरुवात करण्यात येणार असल्याचे अन्न विभागाचे सहआयुक्त शशिकांत केकरे यांनी सांगितले.
केकरे म्हणाले, ‘चायनीज गाडय़ांवर नूडल्सच अधिक प्रमाणात खाल्ले जातात. त्या अनुषंगाने या गाडय़ांची तपासणी करणार आहोत. पुण्यातील चायनीज गाडय़ांकडे एफडीएचा परवाना किंवा नोंदणी आहे का, ते स्वच्छतेच्या नियमांचे पालन करतात का, कच्चा माल काय वापरतात, पदार्थात अजीनोमोटोचे प्रमाण काय वापरतात आदी गोष्टींचा तपासणी अहवालात समावेश आहे.’
ज्या चायनीज विक्रेत्यांनी परवाने घेतले नसतील, त्यांना ते घ्यायला लावले जातील, असे केकरे यांनी सांगितले. या तपासणीत चायनीज पदार्थाचे नमुने देखील घेतले जाणार असून प्रामुख्याने ग्राहकांचा अधिक ओघ असलेल्या ठिकाणांहून चायनीज पदार्थ व त्यासाठीच्या कच्च्या मालाचे नमुने घेऊन त्यांचे विश्लेषण केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.