नवरात्र तोंडावर येऊन ठेपली आहे आणि आता साहजिकच तरुणाईची पावले दांडिया आणि गरब्याच्या क्लासेसकडे वळू लागली आहेत. अगदी पाच हजार रुपयांपर्यंत शुल्क भरून गरबा शिकायला जाण्याकडे तरुणांचा कल आहे.
नवरात्र आणि गरबा हे समीकरण जुनेच! मात्र, नवरात्रीचेही व्यावसायिकीकरण झाले आणि सणाचा ‘इव्हेंट’ झाला. या इव्हेंटमध्ये तरुणाईची पावले आता गरब्याच्या तालावर थिरकू लागली आहेत. धार्मिक संस्था, देवस्थानांपासून मोठी हॉटेल्स आणि इव्हेंट मॅनेजमंेट कंपन्यांकडून दांडिया, गरब्याच्या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक मोठय़ा रहिवासी सोसायटय़ांमध्येही सार्वजनिक गणेशोत्सवाप्रमाणे आता गरबाही आयोजित केला जातो. गरब्यात सहभागी होण्यासाठी तो शिकणे आलेच. त्या पाश्र्वभूमीवर सध्या गरबा आणि दांडियाच्या क्लासेसना तरुणांनी गर्दी केली आहे.
एरवी वर्षभर विविध नृत्यप्रकारांचे शिक्षण देणाऱ्या संस्थांनी नवरात्रीच्या तोंडावर गरबा, दांडियाच्या कार्यशाळा सुरू केल्या आहेत. साधारण आठ दिवस ते एक महिना या कालावधीत हे वर्ग चालवले जातात. अगदी १ हजार रुपये ते ५ हजार रुपयांपर्यंत या वर्गाचे शुल्क असते. मोठय़ा कंपन्यांमध्येही आपल्या कर्मचाऱ्यांसाठी गरब्याचे आयोजन केले जाते. त्यामुळे या कंपन्यांमध्ये काम करणारा वर्गही आवर्जून या क्लासेसकडे वळत आहे. नोकरी करून गरबा किंवा दांडिया शिकायचा असेल त्यांच्यासाठी रात्रीही हे वर्ग घेतले जातात. काही कंपन्या नवरात्रीच्या आधी एक महिना कर्मचाऱ्यांसाठी गरब्याच्या वर्गाचे आयोजन करतात. अगदी पाच ते बारा वर्षांच्या मुलांसाठीही गरब्याचे वर्ग घेतले जातात. अनेक संस्थांकडून आवर्जून एक दिवस लहान मुलांसाठी गरब्याचे आयोजन करण्यात येते. गरब्याच्या क्लासेसबरोबरच गरब्यासाठी घातले जाणारे कपडे, दागिने भाडय़ाने देणे, गरब्याच्या दिवशी मेकअप करून देणे असा एक जोडधंदाही उभा राहिला आहे.
याबाबत गरब्याचे वर्ग घेणाऱ्या शेफाली हिने सांगितले, ‘सध्या माझ्याकडे साधारण दोनशेजण गरबा शिकत आहेत. पारंपरिक गरबा शिकण्यासाठी अधिक पसंती दिली जात आहे. आयटी कंपन्यांमध्ये सध्या गरब्याचा ट्रेंड दिसतो. त्यामुळे या कंपन्यांमध्ये काम करणारे तरुण गरबा शिकायला येतात. नवरात्रीच्या आधी आठ दिवस घेतल्या जाणाऱ्या वर्गाना सर्वाधिक गर्दी असते. गेल्या दोन वर्षांत गरबा शिकण्यासाठी प्रतिसाद वाढला आहे. आपल्याबरोबर पालक लहान मुलांनाही या वर्गाना आणत आहेत.’