रोजच्या आयुष्यात येणाऱ्या छोटय़ा छोटय़ा अडचणींनीही निराश होणाऱ्या.. परीक्षेचा बागुलबुवा बाळगणाऱ्यांपुढे पुण्यातील मिहिर जोशी या विद्यार्थ्यांने जिद्दीचा आदर्श निर्माण केला आहे. वर्षभर कर्करोगाशी झुंज देणाऱ्या मिहिरने दहावीच्या परीक्षेत ९१ टक्के गुण मिळवले आहेत.
मिहिर शशांक जोशी हा पुण्यातील अभिनव शाळेचा विद्यार्थी! त्याचे वडील अभियंता आहेत, तर आई विशेष मुलांसाठी काम करते. गेले वर्षभर मिहिर कर्करोगाशी झुंज देतो आहे. मात्र, तरीही कोणतीही विशेष सवलत न देता त्याने दहावीची परीक्षा दिली आणि ९१ टक्के गुणही मिळवले.
दहावीचे वर्ष सुरू झाले. वर्षांच्या सुरूवातीपासूनच मिहिरने अभ्यासाला सुरूवात केली होती. मात्र, त्यानंतर ३ जुलैला त्याच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्याला कर्करोग असल्याचे निदान झाले. गेल्या वर्षभरात त्याच्यावर ६ वेळेला केमोथेरपीचे उपचार करण्यात आले. अगदी डिसेंबर महिन्यापर्यंत मिहिरला सतत रुग्णालयांत दाखल व्हावे लागत होते. त्यामुळे सतत शाळा बुडत होती, शिकवणीही नियमित करता येत नव्हती. शाळेची वर्षभरातली एकही परीक्षा तो पूर्णपणे देऊ शकला नाही. मात्र, तरीही बोर्डाची दहावीची परीक्षा द्यायची, वर्ष फुकट घालवायचे नाही असे त्याने ठरवले होते. परीक्षेच्या तोंडावर अगदी महिना-दोन महिनेच मिहिरला अभ्यासासाठी मिळाले. परीक्षेसाठी लेखनिक, अधिक वेळेची सवलत घेण्याबाबत त्याला सुचवूनही त्याने कोणतीही सवलत घेतली नाही. मुळातच जिद्दी असलेल्या मिहिरला पुढे वैद्यकीय क्षेत्रात जाण्याची इच्छा असल्याचे त्याची आई भारती जोशी यांनी सांगितले.
मिहिरच्या या लढाईबाबत त्या म्हणाल्या, ‘‘पुढील वर्षी दहावीची परीक्षा देण्याबाबत आम्ही मिहिरला सुचवलेही होते. मात्र, पहिल्यापासून यावर्षीच परीक्षा देण्याची त्याची जिद्द होती. तो इतका सकारात्मक होता की त्याच्यामुळे आमची तयारी झाली आणि आम्ही त्याला प्रोत्साहन दिले. शाळेने, त्याच्यावर उपचार करणारे डॉ. चेतन देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीही खूप मदत केली.’’