पिंपरीतील माजी नगरसेविकेच्या मुलासह दोघे अटकेत

बनावट कागदपत्रांच्या आधारे स्टेट बँक ऑफ हैद्राबादकडून एक कोटी आठ लाख रूपयांचे कर्ज काढून फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरीतील माजी नगरसेविकेच्या मुलासह दोघांना दत्तवाडी पोलिसांकडून अटक करण्यात आली.

या प्रकरणी गणेश राजेश वाघेरे (वय २४, रा. पिंपरी), श्रीनिवास हुबळीकर (वय २८,रा. पिंपळे सौदागर) यांना अटक करण्यात आली आहे. स्टेट बँक ऑफ हैद्राबादचे आता स्टेट बँक ऑफ इंडियात विलीनीकरण करण्यात आले आहे. बँकेच्या व्यवस्थापिका शृंखला जैन यांनी यासंदर्भात दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुबळीकर यांनी वाकड भागात एक बंगला विकत घेतला होता. त्यासाठी त्यांनी बंगल्याच्या मूळ कागदपत्रांवर निगडीतील बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून एक कोटी दोन लाख रूपयांचे कर्ज घेतले होते. त्यानंतर २०१४ मध्ये बनावट कागदपत्रे तयार करून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सिंहगड रस्ता शाखेतून एक कोटी आठ लाख रूपये कर्ज मंजूर करून घेतले होते. मार्च २०१४ ते डिसेंबर २०१५ दरम्यान हुबळीकर यांनी दरमहा हप्ते भरले.  त्यानंतर हप्ते भरणे बंद केले. त्यामुळे बँकेनी कागदपत्रांबाबत शहानिशा केली. कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर बँकेकडून दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.

हुबळीकरला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले. तेव्हा गणेश वाघेरेने बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी मदत केल्याचे निष्पन्न झाले.

गणेश वाघेरेला नुकतीच अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत वाढ केली. दरम्यान, हुबळीकर सध्या न्यायालयीन कोठजीत आहे. सहायक पोलीस निरीक्षक शंकर सलगर तपास करत आहेत.

फरार आरोपी अटकेत

दत्तवाडी पोलिसांनी हुबळीकर आणि वाघेरे यांना अटक केली. तेव्हा महेश घाटे (वय ३२,रा. वाकड) हा पोलीस ठाण्यात आला. वाघेरेच्या अटकेबाबत त्याने पोलिसांकडून माहिती घेतली. तपास अधिकारी शंकर सलगर यांना संशय आला. त्याची चौकशी करण्यात आली. दरम्यान, २०१७ मध्ये पिंपरीत आयुर्विमा महामंडळाची ७३ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्य़ात घाटे आरोपी असल्याची माहिती खबऱ्याने सलगर यांना दिली. गेले दहा महिने तो फरारी होता. त्यानंतर घाटेला ताब्यात घेण्यात आले. पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्य़ात घाटे फरारी होता. त्याला पिंपरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.