पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात असलेल्या आंबेडकर नगर झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे. सिलिंडरचा स्फोट होऊन ही आग लागली असावी असा अंदाज अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे. अग्निशमन दलाच्या १६ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. मात्र तोवर ३ सिलिंडर्सचा स्फोट झाल्याची बाब समोर आली आहे.

या घटनेत आत्तापर्यंत २० घरांना आग लागली आहे. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे कसोशीचे प्रयत्न सुरु आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात एका जवानाला धुराचा त्रास होऊ लागल्याने तो गुदमरला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या आगीत आत्तापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.