मित्रमंडळ चौकातील बंगल्यात पाणी शिरले

पाण्याचा लोट पर्वती भागातील मित्र मंडळ चौकाजवळ असलेल्या आनंदी बंगल्यात शिरला. पाण्याचा वेग पाहता बंगल्यातून बाहेर पडणे शक्य झाले नसते. अशा परिस्थितीत बंगल्यात राहणारे नातू कुटुंबीयांच्या दृष्टीने अग्निशमन दलाचे जवान देवदूत ठरले. दहा महिन्यांच्या बालकासह पाच जणांची सुटका जवानांनी केली.

मित्रमंडळ चौकात आनंदी बंगल्यात पाणी शिरल्याची माहिती बुधवारी रात्री जवानांना मिळाली. बंगल्यात दहा महिन्यांच्या बालकासह पाच जण अडकले असून त्यांना बाहेर पडणे अशक्य झाले असल्याची माहिती मिळाली. त्या वेळी अरण्येश्वर भागातील ट्रेझर पार्क सोसायटी ते पद्मावती दरम्यानच्या पुलावरून पाणी गेले. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. अशा परिस्थितीत जवान रस्ता मिळेल तसे मित्रमंडळ चौकातील आनंदी बंगल्यात रात्री अकराच्या सुमारास पोहोचले.

जवानांनी बंगल्याची पाहणी केली, तेव्हा पाणी पाच ते सहा फुटांपर्यंत शिरले होते. अशा परिस्थितीत बंगल्यात असलेले ज्येष्ठ नागरिक, दहा महिन्यांच्या बालकासह पाच जणांना बाहेर काढायचे होते. दोरीचा आधार देत जवानांनी बंगल्यातून प्रमोद मोरेश्वर नातू (वय ७२), सरिता प्रमोद नातू (वय ६४), मयूरेश प्रमोद नातू (वय ३६), मंजिरी मयूरेश नातू (वय ३०) आणि त्यांचा दहा महिन्यांचा मुलगा राजस यांची सुखरूप सुटका केली. दहा महिन्यांच्या राजसला प्लास्टिकच्या टबमध्ये ठेवून जवानांनी पाण्यातून वाट काढली. अग्निशमन दलाचे जवान मारुती देवकुळे यांनी हा अनुभव सांगितला. ते म्हणाले, की दहा महिन्यांच्या बाळाला आम्ही एक टबमध्ये घेतले होते. त्याची सुखरूप सुटका केल्यानंतर आम्हाला हायसे वाटले.

देवकुळे यांच्यासह कैलास आकाडे, अनिल कांबळे, बाठे यांनी बंगल्यात अडकलेल्या नातू कुटुंबीयांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. नातू कुटुंबीयांनी त्यांचे मनोमन आभार मानले.