महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही बस आणि दुर्घटना हे जणू समीकरणच बनले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये याची प्रचिती पुन्हा एकदा पाहायला मिळाली. कासारवाडीजवळ या बसने अचानक पेट घेतला. सुदैवाची बाब म्हणजे यात प्रवासी नव्हते. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. भोसरी येथून शिवाजी नगरच्या दिशेने बस जात होती. मात्र, अचानक सकाळी सातच्या सुमारास शिवशाही बसने पेट घेतला. रात्री भोसरी येथील सर्व्हिसिंग सेंटरमध्ये बस मुक्कामी होती.

सविस्तर माहिती अशी की, रविवारी सकाळी आठच्या सुमारास शिवाजी नगर बस बसस्थानकातून शिवाजी नगर ते श्रीरामपूर शिवशाही बस (एमएच १४ जीयू २३१०) सुटणार होती. परंतु, त्या अगोदरच पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर कासारवाडी येथे शिवशाहीने अचानक पेट घेतला. चालक पप्पू आव्हाड यांनी तात्काळ बस रस्त्याच्या कडेला घेतली. आजूबाजूच्या नागरिकांनी एबीसी पावडर असलेला सिलिंडर आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु, आग आटोक्याच्या बाहेर गेली होती. तेवढ्यात महामार्गावरून प्रवास करणाऱ्या एका सजग नागरिकाने अग्निशमन दलाला फोन करत पाचारण केले. त्यांनी तात्काळ येऊन काही मिनिटात आगीवर नियंत्रण आणले.

दरम्यान, शिवशाही बसमध्ये प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळला. अद्याप शिवशाही बसला आग का लागली हे कारण अस्पष्ट आहे. अग्निशमन दलाचे अशोक कानडे यांच्या टीमने आगीवर नियंत्रण आणले.