पुण्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या लक्षात घेता आणि दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने दिवाळी सणात सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजविण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर दिवाळी पहाटचे कार्यक्रम घेण्यास देखील मनाई करण्यात आली आहे. असा आदेश पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी काढला आहे.

मागील आठ महिन्यांच्या कालावधीत शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन आपण सर्वांनी केले आहे. त्यानुसार आता दिवाळी सणात देखील प्रत्येक नागरिकाने मास्क, सॅनिटायजर आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे देखील बंधनकारक राहणार आहे. यामध्ये विशेषत शहरातील महापालिकेच्या मालकीच्या शाळा, उद्याने, पर्यटन स्थळे याठिकाणी फटाके उडविण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर यंदाच्या दिवाळीमध्ये कमी आवाजाचे इकोफ्रेंडली फटाके वाजविण्यात यावे किंवा शक्यतो फटाके मूक्त दिवाळी साजरी करावी. त्याच बरोबर दिवाळी फराळ आणि दिवाळी पहाट या कोणत्याही कार्यक्रमांना परवानगी देण्यात आलेली नाही, असे आदेशात म्हटले आहे.

शिवाय, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, मास्कचा वापर न करणे व विना परवाना कार्यक्रमांचे आयोजन केल्याचे आढळल्यास पोलीस आणि महापालिका प्रशासनास कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले आहे.

वाढत्या प्रदुषणामुळे करोना वाढण्याचा धोका असून, त्यामुळे देशातील विविध राज्यातील फटाक्यांवर बंदी घातली आहे. राज्यातही सरकारनं सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास मज्जाव करत फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केलं आहे.