पुणे जिल्ह्यातल्या मावळ येथील डान्सबारमध्ये दोन गटात वाद झाल्याने गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, हा वाद सोडवण्यासाठी गेलेले पोलीस उपनिरिक्षक यामध्ये जखमी झाले आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, मावळमधील फ्लेवर्स डान्स बारमध्ये बिल देण्यावरून दोन गटात वाद झाल्याने एकाला मारहाण करत गोळीबार करण्यात आला, अशी प्राथमिक माहिती मिळते. ही घटना शुक्रवारी (दिं.८) मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, भांडण सोडविण्यासाठी गेलेले पोलीस पोलीस उपनिरिक्षक नितीन मोहिते यांच्या पायावर काहींनी गोळी झाडल्याने ते जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गोळीबार करणाऱ्यांच्या गटामध्ये ५ ते ६ जण असून यांपैकी २ आरोपींना पोलिसांनी पिस्तुलासह ताब्यात घेतले आहे. या आरोपींवर वडगाव मावळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्याच काम सुरू आहे. या घटनेचा अधिक तपास वडगाव मावळ पोलीस करीत आहेत. राज्यसरकारने डान्सबारवरील बंदी उठवल्यानंतर बारमधील कार्यक्रमादरम्यान अशा प्रकारे गुन्हेगारी कृत्य घडल्याची ही पहिलीच वेळ आहे.