‘फिरोदिया करंडक’ आंतरमहाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धेमध्ये गेली अनेक वर्षे आपले स्थान टिकवून असलेल्या महाविद्यालयांना मागे टाकून अनेक नव्या महाविद्यालयांनी यावर्षी स्थान मिळवले आहे.
सामाजिक-आर्थिक विकास संस्था आणि स्वप्नभूमीतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या ‘फिरोदिया करंडक’ स्पर्धेची पूर्व प्राथमिक फेरी ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत झाली. या फेरीमध्ये २४ महाविद्यालयांनी आपल्या एकांकिका सादर केल्या. त्यामधून बारा महाविद्यालयांची प्राथमिक फेरीसाठी निवड झाली आहे. मात्र, गेली अनेक वर्षे या स्पर्धेमध्ये आपले स्थान टिकवून असलेल्या महाविद्यालयांच्या मक्तेदारीला यावर्षी धक्का बसला आहे. त्याचबरोबर अनेक महाविद्यालयांना पहिल्यांदाच या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. सिमलेस एज्युकेशन, ज्ञानगंगा अभियांत्रिकी महाविद्यालय, जयवंतराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, सिम्बॉयसिस कला, वाणिज्य महाविद्यालय आणि यावर्षी अनेक एकांकिका स्पर्धा गाजवलेले भारती विद्यापीठाचे फाईन आर्ट्स कॉलेज या महाविद्यालयांची प्राथमिक फेरीमध्ये निवड झाली असून, ती पहिल्यांदाच फिरोदिया करंडक स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. गेली अनेक वर्षे फिरोदिया करंडक स्पर्धेवर अभियांत्रिकी महाविद्यालयांचे वर्चस्व दिसत होते. मात्र, यावर्षी पारंपरिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांनीही स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले आहे.
याबाबत स्पर्धेचे आयोजक अजिंक्य कुलकर्णी यांनी सांगितले, ‘‘पूर्व प्राथमिक फेरी सुरू केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा कस लागत आहे. गेली काही वर्षे स्पर्धेमध्ये चांगले सादरीकरण करणारी महाविद्यालये यावर्षी प्राथमिक फेरीमध्येही प्रवेश मिळवू शकलेली नाहीत. त्याऐवजी चांगले सादरीकरण केलेल्या काही नव्या महाविद्यालयांना संधी मिळाली आहे.’’
स्पर्धेची प्राथमिक फेरी १७ ते २१ फेब्रुवारीदरम्यान आणि अंतिम फेरी १ मार्चला कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाटय़गृहामध्ये होणार आहे.