लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : करोनाच्या संसर्गात रस्त्यावर उतरून काम करणारे पोलीस करोनाबाधित झाले. राज्यातील ३२९ पोलीस कर्मचाऱ्यांचा करोना संसर्गामुळे मृत्यू झाला. करोना प्रतिबंधक लस उपलब्ध झाल्यानंतर प्रत्यक्ष आघाडीवर काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना लस देण्याचे निश्चित करण्यात आले. पुणे शहर पोलीस दलातील पाच हजार १२९ पोलिसांना करोना लस देण्यात आली आहे.

पुणे पोलीस दलात आठ हजार चारशे पोलीस कर्मचारी आहेत. मंगळवापर्यंत (२ मार्च) शहर पोलीस दलातील पाच हजार १२९ कर्मचाऱ्यांना करोना लस देण्यात आली आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांचे लसीकरण येत्या काही दिवसात पूर्ण होईल. लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आल्याने करोनाच्या संसर्गात काम करणाऱ्या पोलिसांचे मनोबल उंचावले आहे, असे पोलीस उपायुक्त (मुख्यालय) स्वप्ना गोरे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

करोना लस उपलब्ध झाल्यानंतर केंद्र आणि राज्य शासनाने प्रत्यक्ष आघाडीवर (फ्रंटलाइन वर्कर) कर्मचाऱ्यांना लस देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यासाठी शहर पोलीस दलातील कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात आली. ही यादी पोलीस महासंचालक कार्यालयात पाठविण्यात आली. त्यानंतर संबंधित यादी केंद्र शासनाकडे सादर करण्यात आली. करोना लसीकरण सुरू झाल्यानंतर शहर पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसाठी २६ केंद्रे सुरू करण्यात आली. शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील रुग्णालयासह वेगवेगळ्या केंद्रांवर लसीकरण मोहीम पार पडली.

‘ऑनडय़ुटी’ लस

शहर पोलीस दलातील अनेक कर्मचाऱ्यांनी ऑनडय़ुटी लस घेतली. पोलिसांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या केंद्रावर लसीकरण मोहीम राबविण्यात आली. अनेक पोलिसांनी घराजवळ किंवा पोलीस ठाण्यांपासून जवळ असलेल्या केंद्रावर जाऊन लसीकरण केले. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण मोहीम नियोजनबद्धरीत्या राबविण्यात आली.

तांत्रिक अडथळ्यांमुळे मोहीम संथगतीने

ज्या पोलिसांना लस देण्यात आली, त्यांचे नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक यादीत उपलब्ध करून देण्यात आला आहे. लसीकरणाचे प्रमाणपत्र त्यांना मोबाइलवर पाठविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात लसीकरण वेगात झाले. त्या वेळी पोलिसांसाठी असलेल्या केंद्राची संख्या जास्त होती. आता सामान्यांसाठी लस उपलब्ध करून देण्यात आल्याने पोलिसांसाठी असलेल्या केंद्राची संख्या कमी करण्यात आली असली तरी येत्या काही दिवसात लसीकरण मोहीम पूर्ण होईल.  तांत्रिक अडथळे आल्याने मोहीम संथ झाली आहे.