सचिन अंदुरेला २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात अटक केलेला संशयित हल्लेखोर सचिन अंदुरे याने बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण महाराष्ट्र आणि कर्नाटकात घेतले होते, अशी माहिती सीबीआयने रविवारी पुणे जिल्हा सत्र न्यायालयात दिली.

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा सखोल तपास करून सूत्रधाराचा माग काढायचा असल्याने अंदुरेला पोलीस कोठडी देण्याची मागणी सीबीआयने केली. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. मुजुमदार यांनी अंदुरेला २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला सोमवारी (२० ऑगस्ट) पाच वर्षे पूर्ण होत आहेत. नालासोपारा स्फोटके प्रकरणात वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे सीबीआयच्या पथकाने डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयित हल्लेखोर अंदुरे याला शनिवारी (१८ ऑगस्ट) अटक केली. त्यानंतर सीबीआयच्या पथकाने रविवारी त्याला पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले. सीबीआयचे विशेष वकील अ‍ॅड. विजयकुमार ढाकणे यांनी अंदुरेला १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाला केली.

युक्तिवाद करताना अ‍ॅड. ढाकणे म्हणाले, की डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी अंदुरे याने महाराष्ट्र आणि कर्नाटकात पिस्तूल चालवण्याचे प्रशिक्षण घेतले आहे. त्याला हे प्रशिक्षण कोणी दिले, याचा शोध घेण्याबरोबरच डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मुख्य सूत्रधाराचा माग काढायचा असल्याने अंदुरेला पोलीस कोठडी देण्यात यावी.

निरपराध्याला गोवण्याचा प्रयत्न

अ‍ॅड. प्रशांत सालसिंगीकर यांनी बचाव पक्षातर्फे युक्तिवाद केला. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात डॉ. वीरेंद्र तावडे याला अटक करण्यात आली होती. सीबीआयने या प्रकरणात दाखल केलेल्या दोषारोपपत्रात सारंग आकोलकर, विनय पवार यांनी डॉ. दाभोलकर यांची हत्या केल्याचे नमूद केले होते. आकोलकर आणि पवार हे दोघे पसार आहेत. दोषारोपपत्रात अंदुरेचा उल्लेखही नव्हता. राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) १४ ऑगस्टला अंदुरेला चौकशीसाठी बोलावले होते. चौकशीनंतर त्याला सोडून देण्यात आले होते. त्यानंतर सीबीआयच्या पथकाने अंदुरेला चौकशीसाठी बोलावले. काही कागदपत्रांवर त्याच्या सह्य़ा घेतल्या आणि त्याच्या कुटुंबीयांना कोणतीही कल्पना न देता अटक केली. अंदुरे सुशिक्षित आहे. त्याचा वर्षभरापूर्वी विवाह झाला. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात सीबीआयला आरोपीचा माग काढता आला नाही. राजकीय आणि सामाजिक दबावापोटी अंदुरेला अटक करण्यात आली, असा बचाव अ‍ॅड्. सालसिंगीकर यांनी केला.

न्यायालयात कडेकोट बंदोबस्त : सीबीआयने दुपारी साडेबाराला अंदुरेला पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले. रविवार असल्याने न्यायालयात फारशी वर्दळ नव्हती. पोलिसांनी न्यायालयाची सर्व प्रवेशद्वारे बंद केली. पत्रकार आणि पोलीस वगळता इतरांना प्रवेश बंद करण्यात आला होता. न्यायालयाच्या आवारात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाच्या तपासामध्ये आतापर्यंत माळेचे मणी सापडले आहेत. तपास यंत्रणेला लवकरच दोराही सापडेल. त्यातून कटाच्या सूत्रधारापर्यंत पोहोचता येईल, अशी आशा वाटते. – डॉ. शैला दाभोलकर