इमारतीचे काम अर्धवट करून बांधकाम व्यावसायिक पसार
महंमदवाडी परिसरातील एका गृहप्रकल्पातील सदनिकाधारकांची बांधकाम व्यावसायिकाने फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ६४ सदनिकाधाराकांकडून २७ कोटी ३७ लाख रूपये घेऊन बांधकाम व्यावसायिक इमारतीचे बांधकाम अर्धवट सोडून पसार झाला आहे.
याप्रकरणी श्री तिरूपती हाऊसिंग डेव्हलपर्सचा संचालक दिलीप दिनेश पटेल याच्यासह पाच जणांविरूद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदनिकाधारक गौरव गुप्ता (वय ३१, रा. भवानी पेठ) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महंमदवाडी येथे श्री तिरूपती हाऊसिंग डेव्हलपर्सकडून मेपल टॉवर या गृहप्रकल्पाचे बांधकाम दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले. त्याने सोसायटीतील सदनिकाधाराकांकडून पैसे घेतले. भोगवटा पत्र मिळवून लगेच ताबा देतो, असे त्याने सदानिकाधारकांना सांगितले होते. त्यानंतर त्याने इमारतीचे बांधकाम अर्धवट ठेवले. गेल्या काही महिन्यांपासून तक्रारदार गुप्ता यांच्यासह अन्य सदनिकाधारकांनी पटेल याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो तेथे फिरकला नाही. पटेल याने त्याचा मोबाईल क्रमांक बंद ठेवल्याचे उघडकीस आले आहे. त्याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक ए.एम. सोनवणे तपास करीत आहेत.