धरणातून पाणी सोडल्याने नदीकाठच्या भागात पूरस्थिती; ठिकठिकाणी वीजपुरवठा खंडित

दिवसभर सतत लागून राहिलेल्या जोरदार पावसाने बुधवारी पुण्याची दाणादाण उडवली. हंगामात प्रथमच पुणेकरांनी एवढा पाऊस अनुभवला असून, खडकवासला धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे नदीकाठच्या भागात पूरस्थिती निर्माण झाली. प्रचंड पावसात शहरातील प्रमुख रस्त्यांसह गल्ल्यांमध्ये वाहतूक कोंडी झाली. अनेक ठिकाणी पावसामुळे झाडे पडली, तसेच अनेका भागांत वीजपुरवठा खंडित झाला.

‘भारतीय हवामानशास्त्र विभागा’च्या (आयएमडी) नोंदींनुसार पुण्यात सकाळपासून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत २९ मिमी पाऊस झाला. त्यानंतरही पाऊस सुरूच होता.  धरणक्षेत्रातही दमदार पाऊस पडला. पावसाचा जोर वाढल्यामुळे दुपारी तीन वाजल्यापासून खडकवासला धरणातून २२,८०० क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात झाली. दुपारनंतरही पाऊस सुरु राहिल्यामुळे ३१,४०० क्यूसेकने पाणी सोडले गेले. पाण्याची पातळी आणखी वाढण्याची शक्यता असल्यामुळे साडेचारच्या सुमारासच पालिकेतर्फे अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला.

सिंहगड रस्ता भागातील विठ्ठलनगर, एकतानगर, आनंदनगर भागात पाणी शिरण्याची शक्यता असल्याने सायंकाळी अग्निशामक दलाचे पथक तेथे रवाना झाले.   शनिवार पेठेतील नदीपात्रातील रस्ता पाण्याखाली गेल्याने तेथे लावलेल्या सात ते आठ मोटारी बुडाल्या.