मुंबई परिसरासह राज्यात बहुतांश ठिकाणी सलग दुसऱ्या दिवशीही दमदार पाऊस कोसळला. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूरसह सांगली जिल्ह्याच्या काही भागांत अतिवृष्टी झाली. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे.

कोकण किनारपट्टीच्या भागांत आणि मुंबई, ठाणे परिसराला पावसाने अक्षरश: झोडपून काढले. मुंबईत वादळामुळे झाडे कोसळली. सखल भाग जलमय झाले. रेल्वे आणि काही भागांत रस्ते वाहतूकही विस्कळीत झाली. मुंबईमध्ये गुरुवारी २३० मिमी पाऊस झाला. गेल्या चोवीस तासांत पालघर येथे तब्बल ३९० मिमी पावसाची नोंद झाली.

कोकणात बहुतांश ठिकाणी गेल्या चोवीस तासांत २०० ते ३०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पालघर, माथेरान, हडाणू, वैभववाडी, राजापूर, संगमेश्वर देवरूख, चिपळून आदी भागांत सर्वाधिक पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्वर, गगनबावडा, चांदगड आदी ठिकाणीही २०० ते ३०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस नोंदविला गेला. कोल्हापूरमध्येही पावसाचे प्रमाण मोठे आहे.

कोल्हापूरला महापुराचा धोका

कोल्हापूर जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी पावसाचा धुमाकूळ कायम राहिल्याने जिल्ह्याला महापुराचा धोका निर्माण झाला आहे.  जिल्ह्यातील शंभरहून अधिक बंधारे पाण्याखाली गेले असून, एकूण १५ मार्ग बंद झाले आहेत. नदीकाठच्या गावांनी स्थलांतरित होण्याची सूचना जिल्हा प्रशासनाने केली आहे. कोल्हापुरातील पंचगंगा नदी इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे.

कोयनेच्या पाणलोट क्षेत्रातही मुसळधार

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पाऊस होत असल्याने एका दिवसात धरणाच्या पाणीसाठय़ात तब्बल सहा अब्ज घनफुटाने वाढ झाली. सांगली जिल्ह्यातील चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह शिराळा तालुक्यात अतिवृष्टी झाली असून धरणाच्या पाणीसाठय़ात २४ तासांत अडीच अब्ज घनफूट पाण्याची भर पडली. नदीपात्रातील पाणीपातळी वाढत असून काठावरील लोकांना सावधानतेचा इशारा जलसंपदा विभागाने बुधवारी दिला. काखे-मांगले दरम्यानचा पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे शिराळा तालुक्याचा कोल्हापूरशी संपर्क तुटला आहे.

आजही मुसळधार?

हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ९ ऑगस्टपर्यंत कमी-अधिक प्रमाणात पाऊस राहणार आहे. मराठवाडा आणि विदर्भातही काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यांत गुरुवारीही मुसळधार पावसाचा आणि किनारपट्टीच्या भागात सोसाटय़ाचा वारा वाहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.