साडेतीन लाख किलो झेंडूची आवक;  किलोस ५० ते ७० रुपये भाव

दसऱ्यासाठी श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डातील फूल बाजारात झेंडूसह विविध प्रकारच्या फुलांची सोमवारी मोठी आवक झाली. संपूर्ण राज्यातून फूल बाजारात झेंडू विक्रीसाठी पाठविण्यात आला असून बाजारात ३ लाख ४३ हजार ६२६ किलो एवढी झेंडूची आवक झाली. पावसामुळे झेंडूच्या प्रतवारीवर परिणाम झाला आहे. किरकोळ बाजारात सोमवारी एक किलो झेंडूची विक्री प्रतवारीनुसार ५० ते ७० रुपये किलो या दराने करण्यात येत होती.

दसऱ्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून घाऊक फूल बाजारात झेंडूची मोठय़ा प्रमाणावर आवक सुरू झाली. गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत सोमवारी झेंडूची दुपटी, तिपटीने आवक झाली. पावसामुळे झेंडूच्या प्रतवारीवर परिणाम झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठय़ा प्रमाणावर झेंडूची तोड करून बाजारात झेंडू विक्रीसाठी पाठविला. गेल्यावर्षीच्या तुलनेत झेंडूला कमी दर मिळाले. गेल्यावर्षी किरकोळ बाजारात झेंडूची विक्री ८० ते १०० रुपये किलो दराने झाली होती, अशी माहिती फूल बाजारातील व्यापारी सागर भोसले यांनी दिली.

दरम्यान, मार्केटयार्डातील फूलबाजारात पहाटेपासून मोठय़ा प्रमाणावर  फुलांची आवक सुरू झाली. घाऊक बाजारात चांगल्या प्रतीच्या झेंडूला ३० रुपये किलो असा दर मिळाला. गेल्यावर्षीच्या तुलनेत झेंडूला यंदा कमी दर मिळाले. घाऊक बाजारात झेंडू ३ लाख ४२ हजार ६२६ किलो, गुलछडी ७ टन, पांढरी शेवंती २३ ते २४ टन, पिवळी शेवंती ४  टन अशी आवक झाल्याची माहिती पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीकडून देण्यात आली.

घाऊक बाजारातील फुलांचे दर पुढीलप्रमाणे- झेंडू-३० ते ४० रुपये, गुलछडी- २०० रुपये किलो, पांढरी शेवंती-८० ते १८० रुपये, पिवळी शेवंती- ५० ते १५० रुपये

खरेदीसाठी गर्दी आणि कोंडी

शहराच्या मध्यभागातील महात्मा फुले मंडई परिसरातील बाबू गेनू चौक, शनिपार, रामेश्वर चौक परिसरात झेंडू आणि आपटय़ाची पाने  खरेदीसाठी सोमवारी सायंकाळी मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे या भागात कोंडी झाली. दरम्यान, सोमवारी पहाटेनंतर मार्केटयार्डातील शिवनेरी रस्त्यावर मोठय़ा संख्येने झेंडू विक्रीसाठी घेऊन आलेल्या ट्रकमुळे या भागातील वाहतूक विस्कळीत झाली होती. दुपारनंतर या भागातील वाहतूक सुरळीत झाली