पुणे शहरातील कोंढवा, येवलेवाडी या परिसरातील पाणी प्रश्नावर भाजपाचे माजी आमदार योगेश टिळेकर यांच्यासह ४१ जणांनी पुणे महापालिकेच्या स्वारगेट येथील पाणी पुरवठा केंद्रात आंदोलन सोमवारी दुपारी आंदोलन केले. हे आंदोलन या सर्वांना चांगलेच भोवले असून या सर्वांची १४ दिवसांसाठी न्यायलयीन कोठडीत रवानगी होणार आहे.

आंदोलनादरम्यान भाजपा कार्यकर्त्यांनी पाणी पुरवठा अभियंत्यास धक्काबुक्की, शिविगाळ केली. याप्रकरणी स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल झाला. त्यानंतर या सर्वांना ताब्यात घेऊन कोर्टात हजर केले असता, कोर्टाने सर्वांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. याप्रकरणी अभियंता अशिद जाधव यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, “स्वारगेट येथील पाणी पुरवठा ऑफिसमध्ये दुपारच्या सुमारास माजी आमदार योगेश टिळेकर यांच्यासह चार विद्यमान नगरसेवक, तसेच इतर ३५ कार्यकर्ते दाखल झाले होते. यावेळी त्यांनी ऑफिसमध्ये घुसून खुर्च्या, फाईल्स इकडे तिकडे फेकून दिल्या होत्या. त्यानंतर अशिद जाधव, राहुल सोरटे या दोघांना कार्यालयातून बाहेर काढून, कार्यालयास कुलूप लावले होते. काही वेळाने दोघांच्या कपाळाला गंध लावला, हार घातला आणि आरती देखील म्हणण्यात आली.

दरम्यान, त्यांना धक्काबुक्की करीत घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनादरम्यान कपाटाच्या आणि खिडकीच्या काचाही फोडण्यात आल्या. या तोडफोडीत अंदाजे १२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. अशा प्रकारे सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी योगेश टिळेकर यांच्यासह ४१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता कोर्टाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.