लघु व मध्यम उद्योगांकडून व्यवसायवृद्धीसाठी होणारा ‘गुगल’चा वापर वाढावा, यासाठी कंपनी प्रयत्नशील असून खास या व्यावसायिकांसाठी गुगलचे मोफत अॅप लवकरच बाजारात येणार आहे. आपल्या उत्पादनांची माहिती संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यावसायिक हे अॅप वापरू शकतील.
कंपनीच्या लघु व मध्यम उद्योग विक्री विभागाचे प्रमुख सूर्यनारायण कोडुकुला यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गुगलच्या या नव्या अॅपमध्ये व्यावसायिक स्मार्टफोनवरून आपल्या कंपनीचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक याची नोंदणी करू शकणार आहेत. तसेच आपल्या उत्पादनाची छायाचित्रेही ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकणार आहेत.
इंटरनेटच्या वापरात भारत सध्या जगात तिसऱ्या क्रमांकावर असून येत्या एक ते दीड वर्षांत अमेरिकेला मागे टाकून भारत दुसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळवेल अशी अपेक्षा आहे. पुढील वर्षांत देशात इंटरनेटचा वापर करणाऱ्यांमध्ये १० कोटी नागरिकांची भर पडेल अशी अपेक्षा आहे, असे सांगून कोडुकुला म्हणाले, ‘‘देशात ४ कोटी ८० लाख इतके लहान व मध्यम उद्योग आहेत. यातील ६० टक्के उद्योग देशातील १५ प्रमुख शहरांमध्ये एकवटलेले आहेत. या १५ शहरांमध्ये असलेल्या लघु व मध्यम उद्योगांपैकी ७० टक्के उद्योग व्यवसायवृद्धीसाठी इंटरनेटचा वापर करतात. पुण्यातही लघु व मध्यम उद्योगांचे चांगले जाळे आहे. या उद्योगांच्या वाढीसाठी गुगलचा वापर करता येऊ शकेल. गुगलवरील ‘सर्च’मधून ग्राहकांना व्यवसायाविषयी माहिती देणे, स्वतंत्र संकेतस्थळावर किंवा यू-टय़ूबवर उत्पादनांशी निगडित माहिती किंवा व्हिडिओ टाकणे या माध्यमांचा व्यवसायवृद्धीसाठी वापर करता येईल.’’
संगणकाच्या माध्यमातून गुगल वापरणाऱ्यांच्या तुलनेत मोबाइलवरून इंटरनेट वापरणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. इतकेच नव्हे यांपैकी बहुतेक ग्राहक इंटरनेट वापरण्याचा पहिला अनुभव मोबाइलवरच घेतात, असेही त्यांनी सांगितले.