राज्य परिवहन महामंडळातर्फे एसटी गाडय़ांमध्ये मोफत वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्यामुळे स्मार्टफोनधारक प्रवाशांचा प्रवास आता मनोरंजक होणार आहे. एसटीमध्ये प्रवास करताना प्रत्येक सामर्टफोनधारक व्यक्तीला मनोरंजनाचा खजिना अनुभवता येणार आहे. सध्या शिवाजीनगर आणि स्वारगेट आगारातील शिवनेरी, हिरकणी आणि परिवर्तन अशा ५० गाडय़ांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
एसटीचा प्रवास सुखकर, आनंददायी आणि मनोरंजक होण्यासाठी प्रत्येक गाडीमध्ये वायफाय सुविधा देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. यासाठी ‘यंत्र मीडिया सोल्युशन’ या कंपनीद्वारे गाडय़ांमध्ये वाय-फाय यंत्र बसविण्यात येणार आहे. वाय-फाय सुविधेच्या वापरासाठी प्रवासी आपल्या फोनमधील वायफाय सुविधा सुरू करू शकतात. इंटरनेट ब्राऊजर अ‍ॅप उघडल्यानंतर कंपनीने दिलेला युआरएल पत्ता टाईप केल्यानंतर प्राथमिक स्वरूपाची वैयक्तिक माहिती विचारली जाईल. ती माहिती भरल्यानंतर वाय-फाय सेवेचा उपभोग घेता येईल. वाय-फाय सुरू झाल्यानंतर प्रवाशांच्या मोबाइल स्क्रिनवर मराठी, हिंदी किंवा इंग्रजी चित्रपट, चित्रपटातील गाणी, लहान मुलांसाठी कार्टून नेटवर्क चित्रपट, दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील मालिका असा मेन्यू दिसेल. प्रत्येक प्रवाशाला आपल्या पसंतीनुसार या सर्व मनोरंजनाच्या साधनांचा भरभरून उपभोग घेता येणार आहे. प्रवाशांना प्रवासामध्ये फक्त एकदाच वाय-फाय यंत्र जोडावे लागणार आहे. त्यानंतर प्रत्येक प्रवासात त्यांच्या स्मार्टफोनवर वाय-फायची नियमित सुविधा उपलब्ध होणार आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर असणारी ही सुविधा प्रवाशांच्या पसंतीस उतरल्यास लवकरच संपूर्ण राज्यभरातील प्रत्येक एसटी गाडय़ांमध्ये कार्यान्वित केली जाणार आहे, असे महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांनी सांगितले.

‘एसएमएस’द्वारे मागणी
प्रवासामध्ये वाय-फाय सेवेचा लाभ घेताना एखाद्या प्रवाशाला ठरावीक चित्रपट, चित्रपटगीत आणि मालिका पुन्हा पाहण्यासाठी वाय-फाय मेन्यूद्वारे ‘एसएमएस’ करता येणार आहे. त्यानुसार १५ दिवसांमध्ये प्रवाशांनी केलेल्या मागणीच्या आधारे मेन्यू रिफ्रेश करून ही सुविधा देण्यात येईल, असेही रणजितसिंह देओल यांनी सांगितले.