आविष्कार स्वातंत्र्याचे व्यासपीठ असलेल्या साहित्य संमेलनामध्ये रविवारी अभिव्यक्ती स्वातंत्र्यालाच ‘चपराक’ मिळाली. संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्यावर टीका असलेल्या चपराक या मासिकाचे अंक संमेलनाच्या संयोजकांनी जप्त केले. मात्र, दूरचित्रवाणी वाहिन्यांवर या विषयीची बातमी झळकू लागताच हे अंक विक्रीसाठी परत देण्यात आले.
अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांचा चेहरा आणि मुखवटा उलगडणारा लेख चपराक मासिकामध्ये प्रकाशित झाला आहे. ‘कुत्र्याला खीर पचली नाही’ असे शीर्षक असलेला हा लेख घनश्याम पाटील यांनी लिहिला असून त्यामध्ये अध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्यासाठी सबनीस यांनी पाटील यांचा कसा वापर करून घेतला याविषयीचे समीक्षात्मक लेखन आहे. पाटील यांनी हा लेख ब्लॉगस्पॉट आणि फेसबुक या माध्यमांवरूनही प्रसारित केला आहे.
साहित्य संमेलनाच्या ग्रंथनगरीमध्ये चपराक प्रकाशनचे दालन आहे. या दालनामध्ये श्रीपाल सबनीस यांच्यावरील लेख असलेला अंक विक्रीस ठेवण्यात आला आहे. संयोजन समितीतील पाच-सहा कार्यकत्रे रविवारी सकाळी नऊच्या सुमारास या दालनामध्ये आले आणि त्यांनी संमेलनाच्या विरोधात काहीही विकता येणार नाही, असे सांगत चपराक मासिकाचे सुमारे अडीचशे अंक जप्त केले. या दालनामध्ये असलेल्या चपराक प्रकाशनचे व्यवस्थापक तुषार पाटील यांनी हे लेखन संमेलनाच्या विरोधातील नाही तर, संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या विरोधातील आहे, असे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे काहीही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीमध्ये नसलेल्या या कार्यकर्त्यांनी जबरदस्तीने हे अंक जप्त करून नेले. संयोजकांची ही कृती म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी असल्याचे पाटील यांनी सांगितले. त्यानंतर काही काही वेळातच दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून या संदर्भातील वृत्त झळकू लागले. चपराक मासिकाचे हे अंक जप्त करण्यापेक्षाही या बातमीमुळे संमेलनाची बदनामी होत असल्याचे निदर्शनास येताच महामंडळाने ग्रंथप्रदर्शन समितीवर नियुक्त केलेल्या रमेश राठिवडेकर यांनी माफी मागत गुपचूप हे अंक परत केले.