News Flash

उत्तम कलाकृतीसाठी तांत्रिक शिक्षण उपयुक्तच

कोणताही कलाकृती तांत्रिक शिक्षणावर अवलंबून नसते. मात्र, उत्तम कलाकृतीच्या निर्मितीसाठी तांत्रिक शिक्षण हे उपयुक्तच ठरते, असा सूर चित्रपट पटकथालेखनातील दिग्गजांनी व्यक्त केला.

| September 15, 2014 03:10 am

चित्रपटाच्या तांत्रिक अंगाचे शिक्षण देणाऱ्या संस्था नसतानाच्या काळातही उत्तमोत्तम चित्रपट झालेच आहेत. कोणताही कलाकृती तांत्रिक शिक्षणावर अवलंबून नसते. मात्र, उत्तम कलाकृतीच्या निर्मितीसाठी तांत्रिक शिक्षण हे उपयुक्तच ठरते, असा सूर चित्रपट पटकथालेखनातील दिग्गजांनी व्यक्त केला.
‘फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’च्या (एफटीआयआय) पटकथालेखन अभ्यासक्रमाच्या दशतपूर्तीनिमित्त आयोजित चर्चासत्रात ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी, विशाल भारद्वाज, विनय शुक्ला, श्रीराम राघवन, श्रीधर राघवन आणि अश्विन मलिक यांच्याशी प्रिया व्यंकटरमण यांनी संवाद साधला.
गोविंद निहलानी म्हणाले, पटकथा म्हणजे चित्रपट नव्हे. पण, पटकथेशिवाय चित्रपट निर्माणही होऊ शकत नाही. पटकथा हे केवळ कथा सांगण्याचे माध्यम नाही तर या कथेमध्ये प्रेक्षकाला गुंतवून ठेवणे हे चांगल्या पटकथेचे गमक असते. पडद्यावरील चित्रपट पाहताना ती कथा आपली आहे असे प्रेक्षकाला वाटायला लावण्याचे कसब चांगल्या पटकथालेखनासाठी आवश्यक ठरते. पटकथालेखनाचे शिक्षण हे चांगली पटकथा लिहिण्यासाठी पूरकच ठरते. पण, हे शिक्षण संपल्यावर खऱ्या शिक्षणाचा प्रारंभ होतो. आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवून आणि प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेवून लेखन केल्यास कलाकृतीमध्ये जिवंतपणा येतो.
विशाल भारद्वाज म्हणाले, सुरुवातीला तीनचार वर्षे मिळालेला नकार या अनुभवातून मी शिकलो. पटकथालेखनाचे शिक्षण मिळाले असते तर आवडले असते. शिक्षणामुळे आपल्याला किमान काय येत नाही हे तरी समजते.
विनय शुक्ला म्हणाले, चित्रपट पाहूनच मी लिहायला शिकलो. अनुभवातून शिकत गेलो. चांगल्या कलाकृतीसाठी शिक्षण आवश्यक आहे. पण, आपण केलेले लेखन आपल्यालाच भावले, तर प्रेक्षकांना आवडेल हेही ध्यानात घेतले पाहिजे.
पटकथालेखनाची कोणतीही चौकट नसते. त्यामुळे तांत्रिक शिक्षणाची आवश्यकता नसते, असे मत श्रीराम राघवन यांनी व्यक्त केले. दूरचित्रवाणी माध्यमासाठी लेखन करताना पटकथेमध्ये वारंवार बदल करावे लागतात, असे श्रीधर राघवन यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2014 3:10 am

Web Title: ftii seminar script writer
टॅग : Ftii
Next Stories
1 कार्यकर्तेपण हा बदल घडण्यासाठीचा प्राण – प्रकाश जावडेकर
2 पिंपरीत काँग्रेसला गतवैभव मिळवून देऊ; पालिकेची सत्ता हस्तगत करू – सचिन साठे
3 ‘रुपी’प्रश्नीच्या न्यायालयीन याचिकांना ठेवीदार व खातेदारांनी बळकटी द्यावी
Just Now!
X