या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना वेगळी गोष्ट शिकायला मिळेल याची खात्री शिक्षकांना असते. या शाळांमधील शिक्षक आणि वृषाली दातार यांचा नियमित संवाद असतो. एखाद्या उपक्रमात शाळेला मिळालेले एखादे पारितोषिक, शाळेच्या निकालात झालेली वाढ, स्पर्धेत मिळालेले बक्षीस याबाबत शिक्षक आवर्जुन दातार यांना कळवतात.

‘सामाजिक कार्य’ हे दोनच शब्द असले तरी या शब्दांना जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व या शब्दांच्या मागे दडलेल्या कार्यालाही आहे. सामाजिक कार्य करण्यासाठी वेळ, पैसा या दोन गोष्टींची जेवढी गरज लागते, तेवढीच गरज असते इच्छाशक्तीची. ही इच्छाशक्ती निर्माण करण्याची ताकद संस्कारांबरोबरच आजूबाजूच्या वातावरणामध्ये असते. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो असे वाटणे, समाजऋण ही संकल्पना माहीत असणे, हे घडते ते कुटुंबातील सदस्यांमुळे. अशाच संस्कारांची पाळेमुळे घट्ट रुजल्यामुळे सामाजिक कार्याची वाट चोखाळणाऱ्या व्यक्तींमध्ये वृषाली जयप्रकाश दातार यांचे नाव आवर्जुन घ्यावे लागेल.

वकिली व्यवसायात सात वर्षांपासून असलेल्या अ‍ॅड. वृषाली या सहा वर्षांपासून सामाजिक कार्यात आहेत. एका बाजूला स्वत:च्या पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कार्यरत झाल्यानंतर इतरांनाही योग्य आणि उत्तम काही मिळावे यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. ही प्रक्रिया घडण्याचे श्रेय त्या आपल्या आजोबांना आणि वडिलांना देतात. लहाणपणापासून गरजूंना आवश्यक गोष्टी मिळवून देण्यासाठी आजोबांची चाललेली धडपड आणि वडिलांचे सामाजिक कार्य हे दोन्हीही त्या जवळून पाहात होत्या. या दोघांना मिळणारी आईची मोलाची साथ यामुळे वृषाली यांचेही आयुष्य सामाजिक कार्याच्या वाटेवर प्रवास करीत राहिले.

शालेय जीवनापासूनच नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी, सैनिकांसाठी निधी गोळा करून पाठवणे असे उपक्रम सुरू होते. शिक्षण पूर्ण होताना सामाजिक कार्यासाठी आपले स्वत:चे व्यासपीठ असावे असे त्यांना प्रकर्षांने जाणवले. या सगळ्याला अर्थातच घरातून प्रोत्साहन आणि पाठिंबा दोन्हीही मिळाले. त्यातूनच ‘स्नेहांकुर द रे ऑफ होप’ या सामाजिक संस्थेची बांधणी त्यांनी केली. या संस्थेच्या माध्यमातून पुरंदर तालुका, काळदरी, वेल्हा, मुळशी, मांढरदेवी या भागातील विविध पंधरा शाळांच्या समन्वयाने त्या तेथील पंधराशे विद्यार्थ्यांसाठी कार्य करतात. त्यासाठी दर महिन्यातून किमान दोनदा तरी (अर्थातच शाळेच्या सुटीचे वार सोडून) त्या या शाळांमध्ये जातात. या विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम करण्याचे नियोजन आणि काही प्रत्यक्ष उपक्रम राबवितात.

भावी पिढीचे शिक्षण, आरोग्य या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच शाळांमधील पटसंख्या वाढविण्याच्या दृष्टीने दातार यांच्याकडून प्रयत्न केले जातात. शालेय साहित्य वाटप हा प्रमुख उपक्रम संस्थेमार्फत चालविला जातो. पहिल्या वर्षी वीस मुलांना साहित्याचे वाटप करण्यात आले होते, तर त्यानंतर दरवर्षी विविध गावांमधील दीड हजार मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येते.

जून महिन्यात शाळा सुरू झाल्या की मुलांना शालेय साहित्य वाटपापासून दातार यांच्या कार्याला सुरुवात होते. शहरातील मुलांना जी गोष्ट सहजतेने उपलब्ध असते, ती ग्रामीण भागातील मुलांना मिळण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, त्यामुळे त्यांना त्यांची किंमतदेखील कळते, हे अनुभवातून दातार सांगतात. मुलांना नव्याकोऱ्या वह्य़ा मिळाल्याचा आनंद पाढे लिहून, शब्द लिहून दाखवत मुलांकडून व्यक्त केला जातो. या उपक्रमानंतर या मुलांबरोबर साजरा केला जातो तो राखी पौर्णिमेचा सण. या निमित्त विविध भागांतील शाळांमधील मुले-मुली सर्वानाच पर्यावरणपूरक राख्या बांधल्या जातात. रक्षणकर्त्यांची भूमिका आणि या सणाचे महत्त्वदेखील त्या वेळी विद्यार्थी-विद्यार्थिनींमार्फत पोहोचवले जाते. त्यानंतर येणाऱ्या दिवाळी सणाच्या निमित्ताने पणत्या आणणे, त्या विद्यार्थ्यांकडून रंगवून घेऊन त्यांना देणे आदी गोष्टी केल्या जातात. यानंतरच्या काळात आंतरशालेय तसेच वेगवेगळ्या शाळांमधून विविध स्पर्धाचे आयोजन केले जाते. जानेवारीमध्ये तिळगूळ समारंभ केला जातो. सर्व मुलांना तिळगूळ वाटप केल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावरील समाधान या तिळगुळाच्या लाडवापेक्षाही अधिक असते. याशिवाय मुलांचे आनंदमेळावे घेणे, विज्ञान प्रदर्शन, क्रीडा स्पर्धाचे आयोजन, क्रीडा साहित्याचे वाटप आदी उपक्रमदेखील राबवले जातात.

वृषाली यांचे वडील जयप्रकाश तर बंधू अभिजित हेदेखील त्यांच्या या कार्यात सहभागी होतात. एकंदरीतच दातार कुटुंबीयांकडे असलेली सामाजिक तळमळ त्यांच्या विविध उपक्रमांना आर्थिक, शारीरिक आणि मानसिक पाठबळ देत असते. अभिजित सल्लागार म्हणून कार्यरत असून ही दोन्ही भावंड आपल्या व्यवसायाबरोबरच आपल्या वेळेचे सुयोग्य नियोजन करीत भावी पिढीने घडावे यासाठी प्रयत्नशील असतात. याशिवाय त्यांच्याकडून दर महिन्यातून एखादा उपक्रम घेतला जावा म्हणून विविध शाळांतून मागणीदेखील केली जाते. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना वेगळी गोष्ट शिकायला मिळेल याची खात्री येथील शिक्षकांना असते. या शाळांमधील शिक्षक आणि दातार यांचा नियमित संवाद असतो. एखाद्या उपक्रमात शाळेला मिळालेले एखादे पारितोषिक, शाळेच्या शैक्षणिक निकालात झालेली वाढ, स्पर्धेत मिळालेले बक्षीस याबाबत शिक्षक आवर्जुन दातार यांना कळवतात.

या सगळ्या उपक्रमांना त्यांचे मित्र, नातेवाईक आर्थिक मदत करतातच, पण दातार कुटुंबीयांकडूनदेखील आर्थिक योगदान दिले जाते. दातार यांच्याकडून राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांमुळे शाळेची पटसंख्या वाढते हे त्यांच्या कार्याचे यशच म्हणावे लागेल. दातार कुटुंबीयांकडून केल्या जाणाऱ्या उपक्रमांत सहभागी व्हायचे असेल तर ७८७५०४८३१२ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

सामाजिक कार्याची आवश्यकता लक्षात घेऊन दातार कुटुंबीयांकडून सुरू असलेल्या या उपक्रमात आजची तरुण पिढी हिरिरीने सहभागी होत आहे. तरुण पिढीला असणारे सामाजिक भान उद्याच्या पिढीच्या शक्तीचा सुयोग्य वापर होण्याच्या दृष्टीने नक्कीच फायदेशीर ठरेल.

shriram.oak@expressindia.com