मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमधील ३५० विद्यार्थ्यांचे भवितव्य अजूनही अंधारात असून महाविद्यालयाला आर्किटेक्चर काऊन्सिलची अजूनही मान्यता मिळालेली नाही. मान्यता काढून घेण्यात आलेली असतानाही महाविद्यालय सुरू ठेवणे चूक असल्याचे आर्किटेक्चर काऊन्सिलचे अध्यक्ष उदय गडकरी यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना सांगितले.
मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर हे शिक्षकांची संख्या, महाविद्यालयातील सुविधा असे निकष पूर्ण करत नसल्यामुळे २००७ मध्ये या महाविद्यालयाची मान्यता काऊन्सिल ऑफ आर्किटेक्चरने काढून घेतली होती. मात्र, तरीही महाविद्यालयाने वर्ग सुरूच ठेवले. या महाविद्यालयामध्ये शेवटच्या वर्षांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी काऊन्सिल ऑफ आर्किटेक्चरकडे व्यवसायाच्या मान्यतेसाठी अर्ज केला होता. त्या वेळी महाविद्यालयाची मान्यता काढून घेण्यात आल्यामुळे महाविद्यालय आणि पदवी बेकायदेशीर असल्याचे काऊन्सिलने सांगितले होते.
याबाबत गडकरी यांनी सांगितले, ‘‘महाविद्यालय निकष पूर्ण करत नसल्यामुळे त्याची मान्यता काढून घेण्यात आली होती. अशाप्रकारे देशातील अनेक महाविद्यालये निकष पूर्ण करत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विविध महाविद्यालयांमधून उत्तीर्ण होणाऱ्या आर्किटेक्ट्सना व्यवसायाची परवानगी देण्यापूर्वी त्यांच्यासाठी परीक्षा घेण्याचा प्रस्ताव काऊन्सिलने मनुष्यबळ विकास मंत्रालयासमोर ठेवला होता. मात्र, हा प्रस्ताव मंत्रालयाने फेटाळला आहे.’’
याबाबत मराठवाडा मित्रमंडळ संस्थेचे सचिव भाऊसाहेब जाधव यांनी सांगितले, ‘‘आमचे महाविद्यालय अनधिकृत नाही. आम्हाला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, विद्यापीठ अनुदान आयोग, राज्य शासन यांनी मान्यता दिलेली आहे. आर्किटेक्चर काऊन्सिल ही आर्किटेक्ट झालेल्यांना मान्यता देणारी संस्था आहे. आमचे महाविद्यालय अधिकृत आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार काऊन्सिलचा नाही. याबाबत आम्ही न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे.’’