04 March 2021

News Flash

वैभवशाली मिरवणुकीची तयारी पूर्ण

महापौरांच्या हस्ते मानाच्या पाचही गणपतींची आरती होणार आहे.

गणेश विसर्जनादरम्यान अनुचित प्रकार घडू नयेत या उद्देशातून अग्निशमन दलातर्फे जीवरक्षक तैनात करण्यात आले असून त्यांच्या सामग्रीची सोमवारी चाचणी घेण्यात आली.  

टिळक पुतळ्यापासून आज १०.३० वाजता गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ

गणरायाच्या आगमनाने पुलकित झालेल्या पुण्यनगरीतील कार्यकर्त्यांना आता वैभवशाली गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीचे वेध लागले आहेत. गेल्या अकरा दिवसांपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाची मंगळवारी (५ सप्टेंबर) अनंत चतुर्दशीला विसर्जन मिरवणुकीने सांगता होणार आहे. मानाच्या गणपतीला पुष्पहार अर्पण झाल्यानंतर ठीक साडेदहा वाजता ‘ढोल-ताशे’वादनाने गणरायाच्या भावपूर्ण निरोपाला प्रारंभ होणार आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने विसर्जन मिरवणूक तितक्याच दिमाखदारपणे व्हावी यासाठी विविध गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांचे काटेकोर नियोजन सुरू आहे. ही मिरवणूक जल्लोषामध्ये आणि वैभवशाली होत असताना पुण्याच्या लौकिकामध्ये भर पडावी हा कटाक्ष ठेवला जात आहे. गणरायाच्या विसर्जनाची सर्व तयारी पूर्ण झाली असून सर्वानाच आता प्रत्यक्ष मिरवणूक सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. महापौर मुक्ता टिळक आणि पालकमंत्री गिरीश बापट यांनी महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर मानाच्या पहिल्या कसबा गणपती मंडळाची त्यांच्या हस्ते आरती होणार आहे. आरती झाल्यानंतर ठीक साडेदहा वाजता बँडपथकांचे निनादणारे सूर, ढोल-ताशापथकांच्या नावीन्यपूर्ण तालांसह आविष्कार आणि गणेशभक्तांनी केलेला ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर अशा उत्साहात विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. महापौरांच्या हस्ते मानाच्या पाचही गणपतींची आरती होणार आहे.

कसबा गणपती मंडळ

पुण्यनगरीचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंडळ या मानाच्या पहिल्या गणपतीची मिरवणूक महापौर मुक्ता टिळक यांनी पुष्पहार अर्पण केल्यानंतर सुरू होईल. त्यापूर्वी सकाळी नऊ वाजता उत्सव मंडपापासून मिरवणुकीने ‘श्रीं’ची मूर्ती महात्मा फुले मंडई येथे पोहोचेल. देवळाणकर बंधू यांचा नगारावादनाचा गाडा मिरवणुकीच्या अग्रभागी असेल. त्यापाठोपाठ रमणबाग प्रशालेचे ढोल-ताशापथक, कामयानी विद्या मंदिरातील विशेष मुलांचे ढोल-ताशापथक असेल.  श्री श्री रविशंकर यांच्या ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ संस्थेच्या कार्यकर्त्यांचे पथक स्वातंत्र्यपूर्व काळातील गणेशोत्सवाची माहिती देणारे फलक घेऊन सहभागी होणार आहेत. रोटरी क्लब ऑफ सिंहगड रस्तातर्फे परदेशी नागरिकांचा सहभाग असलेली िदडी आणि बँक ऑफ इंडियाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांचे पथक ‘डॉल्बीमुक्त पुणे’ हा संदेश देणार आहेत. पारंपरिक चांदीच्या पालखीत गणराय विराजमान असतील.

श्री तांबडी जोगेश्वरी मंडळ

श्री तांबडी जोगेश्वरी मंडळ या मानाच्या दुसऱ्या गणपतीची चांदीच्या पालखीतून मिरवणूक निघणार आहे.  सकाळी नऊ वाजता उत्सव मंडपामध्ये आरती होणार आहे. सतीश आढाव यांचा नगारावादनाचा गाडा, न्यू गंधर्व बँडपथक मिरवणुकीच्या अग्रभागी असेल. पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या अश्वारूढ युवतींचे पथक, शौर्य आणि शिवमुद्रा ढोल-ताशापथके, लोककलांचे सादरीकरण करणारे सिम्बायोसिस ईशान्य केंद्राच्या विद्यार्थ्यांचे पथक ही या मिरवणुकीची वैशिष्टय़े आहेत.

अखिल मंडई मंडळ

तुळजाभवानीची भव्य प्रतिकृती असलेल्या जगदंबा रथामध्ये अखिल मंडई मंडळाच्या शारदा-गजाननाची मूर्ती विराजमान असेल. न्यू गंधर्व बँडपथक, शिवगर्जना ढोल-ताशापथक आणि नूमवि प्रशालेच्या विद्यार्थ्यांचे घोषपथक मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहे.

भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टची मिरवणूक जुन्या लाकडी पारंपरिक रथातून निघेल. श्रीराम, आवर्तन आणि नादब्रह्म ही तीन ढोल-ताशापथके मिरवणुकीच्या अग्रभागी असतील. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांच्या जीवनकार्याची माहिती एलईडी स्क्रीनद्वारे देण्यात येणार आहे.

तुळशीबाग मंडळ

वैविध्यपूर्ण सजावटीच्या माध्यमातून गणेशोत्सवामध्ये सहा दशके सेवा करणारे ज्येष्ठ शिल्पकार डी. एस. खटावकर यांचा नातू विपुल खटावकर याने साकारलेल्या गरूड रथातून श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या मानाच्या चौथ्या गणपतीची मिरवणूक निघणार आहे. २४ फूट उंचीचा हा रथ आकर्षक फुलांनी सजविण्यात येणार आहे. गजलक्ष्मी ढोल-ताशापथक, स्व-रूपवर्धिनीचे ध्वजपथक, रामवाडी येथील हिंदू तरुण मंडळाचे तालपथक मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहे.

केसरीवाडा गणपती

बिडवे बंधू यांचा सनई-चौघडावादनाचा गाडा केसरीवाडा या मानाच्या पाचव्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत अग्रभागी असेल. श्रीराम आणि शिवमुद्रा ही ढोल-ताशा पथके मिरवणुकीमध्ये असतील. पारंपरिक चांदीच्या पालखीमध्ये ‘श्रीं’ची मूर्ती विराजमान असेल.

दगडूशेठ हलवाई गणपती

प्रसिद्ध शिल्पकार विवेक खटावकर यांनी साकारलेल्या आणि मोतीया रंगाच्या लक्षावधी दिव्यांनी उजळून निघणाऱ्या धूम्रवर्ण रथातून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टची मिरवणूक निघणार आहे. देवळाणकर बंधू यांचा नगारावादनाचा गाडा, दरबार, प्रभात आणि स्वरझंकार या बँडपथकांबरोबरच स्व-रूपवर्धिनीच्या पथकाचा मिरवणुकीमध्ये सहभाग असेल.

श्री गुरुजी तालीम मंडळ

लक्ष्मी रस्त्यावर पहिल्यांदा गुलालाची उधळण करणाऱ्या श्री गुरुजी तालीम मंडळ हा मानाचा तिसरा गणपती सुभाष सरपाले आणि स्वप्निल सरपाले यांनी साकारलेल्या मनोहारी पुष्परथामध्ये विराजमान असेल. जयंत नगरकर यांचा नगारावादनाचा गाडा मिरवणुकीत अग्रभागी असेल. नादब्रह्म, शिवगर्जना, चेतक स्पोर्ट्स क्लब ही ढोल-ताशापथके मिरवणुकीचे आकर्षण केंद्र असतील. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या हस्ते गणपतीची आरती होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2017 3:33 am

Web Title: ganesh visarjan 2017 pune ganpati miravnuk ganpati visarjan pune
Next Stories
1 यंदा विसर्जन मिरवणूक किती तासांची?
2 गणेश विसर्जन तयारीची महापौरांकडून पाहणी
3 उत्तर कोरियाच्या बॉम्ब चाचणीची जगभरातील भूकंपमापक यंत्रांवर नोंद
Just Now!
X