नागरिकांच्या घरावर दगडफेक
वारजे येथील विठ्ठलनगर परिसरात शनिवारी ( ४ मे) रात्री गुंडांनी धुडगूस घातला. गुंडांनी नागरिकांच्या वाहनांची तोडफोड केली तसेच घरांवरही दगडफेक केली. या घटनेमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारींवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वारजे येथील विठ्ठलनगर परिसरातील म्हाडा वसाहतीत गुंडांच्या दोन गटांत हाणामारी झाली. दोन्ही गटांकडून परिसरातील चौदा वाहनांची तोडफोड करण्यात आली. घरांवर दगड फेकण्यात आले. त्यामुळे रहिवासी भयभीत झाले. धुडगूस घालणाऱ्या गुंडांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी तेथील रहिवाशांनी केली आहे. शहरातून तडीपार करण्यात आलेल्या गुंडांनी तेथे धुडगूस घातला, असा आरोप रहिवाशांनी केला आहे. दरम्यान याप्रकरणी वारजे पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत.
दत्तात्रय किसन जोरी (वय ३९, रा. म्हाडा वसाहत, वारजे ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सूरज पिंपरे, निहाल शिंदे, जावेद पठाण, प्रशांत शिंदे, राजू आणि सागर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर संभाजी सीताराम पिंपरे (वय ५२, रा. पिंपरे निवास, चैतन्य चौक, वारजे) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रोहित पासलकर, मंदार उर्फ मन्या जोशी, संकेत शिंदे, अक्षय जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुंडांच्या टोळक्याने चौदा वाहनांची तोडफोड केली आहे. यामध्ये कमलाकर गलांडे आणि धन्यवाद डावरे यांच्या मोटारीचा समावेश आहे. टेम्पो आणि दुचाकींची तोडफोड क रण्यात आली. पासलकर हा सराईत गुंड आहे. त्याला पुणे शहरातून तडीपार करण्यात आले होते. दरम्यान पसार झालेल्या गुंडांचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.