ताथवडे, चिखलीत वाहनांची तोडफोड

पिंपरी-चिंचवड शहरातील टोळक्यांचा धुडगूस कायम असून चिखली व ताथवडे येथील दोन स्वतंत्र घटनांमध्ये अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. ताथवडे येथील घटनेत दोन अल्पवयीन मुलांसह १२ जणांच्या टोळक्याने १३ वाहने फोडली. केवळ दहशत निर्माण करण्याचा हेतू त्यामागे असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

ताथवडे येथे २४ एप्रिलच्या मध्यरात्रीनंतर १२ जणांच्या टोळक्याने लोखंडी तलवार, लाकडी दांडके, दगड, विटांच्या साहाय्याने वाहनांची तोडफोड केली. यामध्ये पाच कार, तीन रिक्षा, एक दुचाकी, एक बस, एक टेम्पो अशा १३ वाहनांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. या घटनेतील आरोपींमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा सहभाग असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. इतर पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्याच भागात राहणारी ही मुले असून दारू पिऊन िधगाणा घालतानाच दहशत निर्माण करण्यासाठीच त्यांनी हा उद्योग केल्याचे पोलिसांनी सांगितले.

दुसऱ्या घटनेत, चिखलीतील घरकुल प्रकल्पाच्या ठिकाणी एका टेम्पोसह दोन वाहने फोडण्यात आली. सोमवारी रात्री ही घटना घडली. मात्र, पोलीस दप्तरी त्याची नोंद करण्यात आली नाही.

तोडफोडीच्या घटनांमध्ये वाढ

यापूर्वी, १५ एप्रिलच्या पहाटे खराळवाडी येथे अशाच प्रकारे ४० ते ५० जणांच्या जमावाने परिसरातील वाहनांची तोडफोड केली होती. गेल्या दोन वर्षांपासून शहरभरात सातत्याने तोडफोडीच्या घटना सुरू आहेत. मात्र, पोलिसांकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने हे प्रकार थांबण्याची कोणतीही चिन्हे नाहीत.