देश मंदीच्या गडद छायेत असून यातून विघनहर्ता गणपती बाप्पा देखील सुटले नाहीत. मंदी आणि जीएसटी यामुळे यावर्षी गणेश मूर्तींचे भाव कडाडले असून १५ टक्के दरवाढीचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. मात्र, श्रद्धेचा प्रश्न असल्याने भाविक अधिकचे पैसे देऊन मूर्ती खरेदी करत आहेत. दरम्यान, सरकारने वेळीच लक्ष घातले पाहिजे, असं मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले आहे.

एकीकडे भाविकही नाराज असताना दुसरीकडे मूर्तिकारही भाववाढीमुळे नाराज आहेत. गणपती बाप्पाच्या मूर्तींचे भाव पंधरा टक्क्यांनी वाढले असून उत्पन्न निम्म्याने कमी झाले आहे. हा मंदी आणि जीएसटीचा परिणाम असल्याचे मूर्ती विक्री करणारे व्यवसायिक सांगतात. दरवर्षी गोरख कुंभार हे ४ हजार गणेश मूर्ती साकारतात, मात्र यावर्षी केवळ २ हजार मूर्ती त्यांनी साकारल्या आहेत. आपल्या गणेश मूर्तींची विक्री होणार नाही, अशी भिती आपल्या मनात होती, असे ते बोलताना सांगतात. त्यातच कडाडले भाव यामुळे अनेक ग्राहकांनी यावर्षी पाठ फिरवल्याचे दिसत आहे.

तर दुसरीकडे मूर्ती कमी किंमतीत देण्यास परवडत नसल्याचे व्यवसायिक सांगतात. गेल्या तीस वर्षांपासून कुंभार कुटुंब हे मूर्ती तयार करून विक्री करण्याचे काम करतात, मात्र एवढी वाईट वेळ व्यवसायावर आली नव्हती असेही ते म्हणाले. तर दुसरीकडे गणेश मूर्तींचे भाव वाढल्याने भाविकही नाराज झाले आहेत.