स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेचा कारभार म्हणजे दिव्या खाली अंधार असे चित्र असल्याचे दिसते. देशभरात स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छतेसंदर्भात अनेक उपक्रम राबवले जात असताना चक्क पालिकेसमोर कचऱ्याचा ढीग साचताना दिसत आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून कचऱ्याची समस्या भीषण होताना दिसत आहे. शहरातील कचराकुंडीतील कचरा वेळेवर उचलला जात नाही. शहरासह महापालिकेच्या मुख्य इमारतीसमोरील कचराकुंडी ही याला अपवाद नाही. याठिकाणी देखील कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे स्वच्छतेचा नावाने केवळ बोभाटा सुरु असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण होत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबविले जात आहे. लाखो रुपये खर्च करून महापालिकेने ठिकठिकाणी कचराकुंड्या ठेवल्या आहेत. मात्र, या कचराकुंड्या तुडूंब भरल्यानंतरही पालिका प्रशासन कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे कष्ट घेताना दिसत नाही. कुंड्यातील कचरा हा त्याच ठिकाणी अस्ताव्यस्त पडलेला दिसून येतो.

कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी अनेक वेळा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेवर आंदोलन करण्यात आली. शहरातील कचरा साफ होत नसल्याने मनसेने थेट महापालिकेत कचरा आणून टाकल्याचा प्रकार घडला. मात्र, त्यानंतरही कचऱ्याच्या समस्येकडे दुर्लक्ष झाले. दोन वर्षांपूर्वी ज्या शहराला क्लिन सिटीचा पुरस्कार मिळाला ते शहर सध्या कचऱ्याच्या विळख्यात अडकले आहे. सत्ताधारी भाजपने शहराला कचऱ्यात आणले आहे, असा आरोपही विरोधकांकडून करण्यात आला. चिखली परिसरात कचरा उचलला जात नसल्याने महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर ‘कचरा फेको’ आंदोलन देखील करण्यात आले. मात्र, कोणतेच आंदोलन पालिकेने गांभिर्याने घेतल्याचे दिसत नाही.