News Flash

ऐन दिवाळीतही पिंपरी-चिंचवडमध्ये कचऱ्याचे ढीग

शहरात गेल्या काही दिवसांपासून कचऱ्याची तीव्र समस्या निर्माण झालेली आहे.

नागरिक त्रस्त; पालिका प्रशासन सुस्त

ऐन दिवाळीसारख्या मोठय़ा सणासुदीच्या दिवसातही पिंपरी-चिंचवड शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. या समस्येवरून सातत्याने टीका होऊनही कचऱ्याची समस्या आटोक्यात येत नसल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. ‘कागदी घोडे’ नाचवणारे पालिका प्रशासन मात्र सुस्त असल्याचे प्रकर्षांने दिसून येत आहे.

शहरात गेल्या काही दिवसांपासून कचऱ्याची तीव्र समस्या निर्माण झालेली आहे. शहरातील जवळपास सर्वच भागात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. कचराकुंडय़ा भरून वाहात आहेत आणि त्यामुळे परिसरात दरुगधी पसरली आहे. या संदर्भात नागरिक सातत्याने तक्रारी करत आहेत. लोकप्रतिनिधी या समस्या सोडवण्यासाठी शक्य त्या पद्धतीने पाठपुरावा करत आहेत. मात्र, त्याचा काहीही उपयोग होत नसून समस्या ‘जैसे थे’ राहिल्याचे दिसून येत आहे. पिंपरी पालिकेचा कारभार पाहणाऱ्या दोन आमदारांनी एक महिन्यापूर्वी मुख्यालयात आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक घेतली. कचऱ्याच्या समस्येवरून प्रशासनाला धारेवर धरण्यात आले. त्यानंतर, परिस्थिती सुधारेल, असे वाटले होते. प्रत्यक्षात तसे काही झाले नाही.

महिनाभरानंतरही कचऱ्याची समस्या सुटली नसून काही ठिकाणी त्या समस्येने उग्र स्वरूप धारण केले आहे. गेल्या आठवडय़ात मनसेने पालिका मुख्यालयात ‘कचरा फेको’ आंदोलन करून कचऱ्याच्या या भीषण समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. तरीही काही फरक पडलेला नाही. मनुष्यबळ कमी आहे, कचरा उचलण्यासाठी वाहने कमी पडत आहेत, असे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचे रडगाणे कायम आहे. मंगळवारपासून दिवाळीला सुरूवात झाली, तरीही शहरातील कचऱ्याची समस्या जशीच्या तशी आहे. ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कचऱ्याचे ढीग साचल्याचे गुरूवारी दिसून आले. शहरभरातील नागरिक या समस्येला वैतागले आहेत. अधिकारी केवळ कागदी घोडे नाचवत असून आवश्यक उपाययोजना होत नसल्याने नेत्यांनी फटकारले, मात्र आयुक्तांनी कारवाईचा इशारा दिल्यानंतरही परिस्थिती तशीच आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2017 3:10 am

Web Title: garbage issue in pimpri chinchwad pcmc 2
Next Stories
1 मेट्रोसाठीच्या भूसंपादनाचा नवा प्रस्ताव सादर
2 रेल्वे स्थानकाच्या आवारातील चोऱ्या रोखणार
3 कामावरची दिवाळी : दिवाळी खरेदीचा आनंद देणारे ‘कुरिअर बॉय’
Just Now!
X